शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ - लातूर राज्यमार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होत आहेत. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येथील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी याविरोधात आक्रमक पावित्रा घेत पालकमंत्र्यांना साकडे घातले आहे.
शिरूर अनंतपाळ - लातूर राज्यमार्गाची दहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या राज्यमार्गावर बोरी गावाजवळ विहिरीच्या आकाराचे जीवघेणे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात तर या खड्डयांतून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागत आहे. हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरत आहेत. यावेळी वाहनचालकांना अंदाज येत नसल्यामुळे अपघात वाढले आहेत. त्यामुळे येथील सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या राज्यमार्गाच्या दुरूस्तीसाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा सेवानिवृत्त प्राचार्य एल. बी. आवाळे यांच्या नेतृत्वात अभियंता भगवान धुमाळे, माजी सैनिक आनंदा कामगुंडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. या निवेदनात रस्त्याची तातडीने दुरुस्ती न झाल्यास बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
सर्वात जवळच्या मार्गामुळे वाहतूक...
शिरूर अनंतपाळ - लातूर राज्यमार्ग वलांडी, देवणी, उदगीरमार्गे कर्नाटक राज्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. परंतु, मुशिराबाद गावात आाणि बोरी गावाजवळील वळण रस्ता मागील दहा वर्षांपासून प्रलंबित राहिला आहे. पावसाळ्यात हा मार्ग जीवघेणा बनला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना निवेदन देऊन रस्ता दुरूस्तीसाठी साकडे घालण्यात आले आहे.
आठ दिवसात रस्त्याची दुरूस्ती...
शिरूर अनंतपाळ - लातूर राज्यमार्गाच्या दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. जाधव यांना निवेदन दिले असता, त्यांनी आठ दिवसात रस्त्याची दुरूस्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे, असे एल. बी. आवाळे म्हणाले.