शिरुर अनंतपाळ तालुक्यात ४२ ग्रामपंचायती असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानासह ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या वार्षिक जमा-खर्चाच्या नोंदी करण्यासाठी शासनाच्या वतीने ई-ग्रामस्वराज अकाऊंटिंग साॅॅफ्टवेअर प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्यात नोंदणी करण्यात जिल्ह्यात शिरुर अनंतपाळ तालुका अव्वल ठरला आहे.
जिल्ह्यात एकूण ७८५ ग्रामपंचायती असून, त्यातील सन २०२०-२१ या अर्थिक वर्षातील इयर बुक क्लोज केलेल्या ३८० ग्रामपंचायती आहेत. ४०५ ग्रामपंचायतीच्या नोंदी शिल्लक आहेत. मात्र, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एकूण ४२ ग्रामपंचायतीनी आर्थिक जमा-खर्चाच्या नोंदी १०० टक्के पूर्ण करीत लातूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला आहे. यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकिशोर शेरखाने यांनी मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा सहायक गटविकास अधिकारी दिनकर व्होटे, तालुका समन्वयक संतोष शिंगाडे, सर्व ग्रामसेवक तसेच सर्व संगणक परिचालकांनी हे काम वेळेत पूर्ण केले.