कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यात अहमदपूर तालुका दुसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या तालुक्यात ३५७ ॲक्टिव्ह रुग असून आतापर्यंत तालुक्यातील बाधितांची संख्या २ हजार ३१७ वर पोहोचली आहे. गृहविलगीकरणात ३०७ जण असून त्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दरम्यान, गृहविलगीकरणातील काही जण घराबाहेर पडून फिरत आहेत. एक बाधित कामानिमित्ताने बाहेरगावी जाऊन आला. ही बाब उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने त्यास १० हजारांचा दंड आकारला. तसेच पालिकेने त्याला संस्थात्मक क्वॉरंटाईनसंबंधी सूचना केल्या.
दरम्यान, आता गृहविलगीकरणातील सर्वांवर नियंत्रण ठेवले जाणार असून त्यांच्याशी संपर्क केला जाणार आहे. तसेच पडताळणी केली जाणार आहे. जर नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळून आल्यास दंड आकारण्यात येऊन संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले जाणार आहे. याबाबत येथील तहसील कार्यालयात बुधवारी बैठक झाली. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, गटविकास अधिकारी अमोल अंदेलवाड, आगाराचे व्यवस्थापक शंकर सोनवणे उपस्थित होते.
कोविड रुग्णालयाची सुविधा देणार...
तालुक्यत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातील कक्षाचे रुपांतर करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सर्व व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. दहा बेड ऑक्सिजनचे तयार ठेवण्यात आले आहेत, असे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.
दंड आकारण्यात येणार...
शहर व तालुक्यात गृहविलगीकरणात ३०७ जण आहेत. शहरातील बाधित काहीजण घराबाहेर फिरत असल्याचे लक्षात आले आहे. आता तसे आढळून आल्यास पालिकेच्या वतीने संबंधित रुग्णांवर कायदेशीर कारवाई करून दंड आकारण्यात येऊन त्यांना संस्थात्मक क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.
९ हजार जणांना लसीकरण...
ग्रामीण रुग्णालय तसेच पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात आतापर्यंत ९ हजार ४ जणांना लसीकरण करण्यात आले आहे. त्यात ग्रामीण रुग्णालयात ४ हजार ३३२ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात ४ हजार ६५२ जणांना लसीकरण झाले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.