गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात गेल्या वर्षी २४ मार्चपासून ते जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन होता. जून महिन्यापासून अनलॉकचे टप्पे सुरू झाले. त्यामुळे टप्प्याटप्प्याने बहुतांश उद्योग, धंदे सुरू झाले. दुसरीकडे नर्सरी ते आठवीचे वर्ग सुरू झाले नाहीत. त्यामुळे स्कूलबसची चाकेही जागेवरच होती. याचा सर्वाधिक फटका स्कूलबसच्या मालक, चालकांना बसला आहे. ९ ते १२ वीचे वर्ग केवळ एका महिन्यासाठी सुरू राहिले. गत १४ महिन्यांपासून स्कूलबस धावल्या नसल्याने चालक, मालकांसमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? असा पेच निर्माण झाला. स्कूल बसमधून खासगी प्रवासी वाहतूकदेखील करता येत नसल्याने स्कूलच्या अनेक चालकांना पर्यायी व्यवसाय शोधावा लागत आहे. काही जणांनी भाजीपाला विक्री, काहींनी शेतात मजुरी तर काहींनी ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हातात घेतले आहे. १४ महिन्यांपासून वाहन उभे असतानाही विविध प्रकारचा कर भरण्याची वेळ आली आहे. यामुळे स्कूलबसच्या मालकांसमोरही आर्थिक प्रश्न निर्माण झाला. काहींनी पर्यायी व्यवसाय सुरू केला तर काही जणांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. काही चालकांनी अन्य वाहनावर चालक म्हणून रोजगार शोधला आहे. काही स्कूल व्हॅन, ऑटोवाल्यांनी शहरात खासगी प्रवासी वाहतूक करण्याचा प्रयल चालविला. मात्र, यामध्ये फारसे यश नाही.
श्रीकृष्ण पाडे, स्कूल बसमालक,
भाजीपाला विक्री करतात..
गेल्या दीड वर्षांपासून स्कूलबस बंद असल्याने आर्थिक पेच निर्माण झाला. पाडे यांच्या घरात पत्नीसह मुले आहेत. सर्वांची जबाबदारी एकट्यावर आहे. घर चालविण्याकरिता काही तरी मिळकत हवी म्हणून ते भाजीपाला विक्रीचे काम करीत आहेत. मात्र, यामधूनही फारसे उत्पन्न हाती येत नसल्याने आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
- अनिल शिंदे, स्कूल बसचालक
वाहनावर ड्रायव्हर म्हणून काम...
अनिल शिंदे हे स्कूल बसचालक असून, त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुले आहे. ते घरातील कर्ता पुरुष असून, उदरनिर्वाहासाठी दुसरे साधन नाही. सरकारनेदेखील चालक, मालकांसाठी पॅकेज दिले नाही. स्कूलबस बंद असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी खासगी गाड्यांवर चालकाचे काम करतात. मात्र, संचारबंदीमुळे तेही बंद आहे.
- संदीप वाघ, स्कूल बसचालक
भाजीपाला विक्रीतून उदरनिर्वाह
संदीप वाघ हे बसचालक आहेत. कुटुंबात एकटेच कमावते असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. मुलांचे शिक्षण, इतर खर्च कसा भागवावा असा प्रश्न आहे. सध्या स्कूलबस बंद असल्याने भाजीपाला विक्रीला प्राधान्य देत आहे. शासनाने स्कूल बसचालकांना आर्थिक साहाय्य करण्याची गरज आहे.
- विनोद करकिले, स्कूल बसमालक
हाताला काम नसल्याने अडचण...
स्कूलबस बंद असल्याने आर्थिक पेच निर्माण झाला. त्यातच फायनान्सवाले हे नियमित हप्ता भरण्यासाठी तगादा लावतात. वेळप्रसंगी वाहन नेण्याची धमकी देतात. काही फायनान्स कंपन्यांनी तशी कार्यवाही करणे सुरू केले. कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा? की फायनान्सचे हप्ते भरावेत? असा पेच स्कूल बसमालकांसमोर उभा ठाकल्याचे करकिले यांनी सांगितले.
सुरेंद्र सुरवसे, स्कूल बसचालक
मिळेल ते करावे लागते काम...
सुरेंद्र सुरवसे स्कूल बसचालक म्हणून काम करतात. १४ महिन्यांपासून कोरोनामुळे स्कूलबस बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. काही दिवस उसनवारी करून उदरनिर्वाह केला. मिळेल ते काम करण्याची वेळ आली आहे. सरकारने एखादे पॅकेज जाहीर करून स्कूलबस चालक, मालकांना दिलासा देणे अपेक्षित ठरत आहे, असे सुरवसे यांनी सांगितले.
मुले दररोज स्कूलबसने प्रवास करायचे ३८५००
जिल्ह्यातील स्कूल बसचालक ६३०
जिल्ह्यातील एकूण चालक ६३०