शहाजानी : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेकदा रुग्णांना खाटा मिळत नाहीत. त्यामुळे मोठी हेळसांड होत असल्याचे पाहून माकणी थोर येथील हनुमान देवस्थान समितीने एक एकर जागेवर निशुल्क दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत येथील सपोनि सुधीर सूर्यवंशी यांनी एक महिन्याचे वेतन देण्याचे जाहीर केले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे उपचारासाठी खाटाही उपलब्ध होत नाहीत. परिणामी, रुग्णांची गैरसोय होत आहे. सध्याची परिस्थिती ही कठीण आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना आधार देऊन उपचाराची मदत मिळावी म्हणून निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथील हनुमान देवस्थान समितीने मंदिर संस्थेच्या स्वत:च्या मालकीच्या जागेत एक एकरवर निःशुल्क दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सामाजिक बांधिलकी जपत औराद (शहाजानी) येथील पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी यांनी एक महिन्याचे वेतन दवाखान्याच्या उभारणीसाठी देण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.