संजय चव्हाण या बहुरुप्याने आपली ही पारंपरिक कला पाेटाला चिमटा देत, वेळप्रसंगी उपाशी-तापाशी राहून जोपासली आहे. संजय चव्हाण हे मूळचे घाटनांदूर येथील रहिवासी आहेत. त्यांचा बहुरूपी हा पारंपरिक व्यवसाय आहे. वडिलांची कला संजय चव्हाण यांनी कायम जपली आहे. याच कलेवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आज सुरू आहे. त्यांचे मुलेही चांगल्या प्रकारे हिच कला जोपासत आहेत. संजय चव्हाण हे शुक्रवारी अहमदपूर शहरातील विविध दुकानांत पोलिसी खाक्या दाखवत फिरत होते. जणू खरोखरच पोलीस आला काय? असे म्हणत लोकही काहीक्षण हैराण होत असत तर त्यांचे नाटकी बोलणे पाहून तर बरेचजण काही काळ गोंधळून जात होते. त्यामुळे नकळत चव्हाण यांच्या हातावर ५ किंवा १० रुपये टेकविल्यानंतरच त्यांच्या बोलण्याची गती मंदावत होती. आजच्या काळात ही कला खरोखरंच लोप पावत चाललेली आहे. बहुरूपी कलाकार गावागावात जाऊन हनुमान, राम, लक्ष्मण, पोलीस, वकील अशा विविध नाटकी भूमिका साकारून ग्रामस्थांची मने जिंकत असत. आजच्या काळात सोंग, नाटकांचे प्रयाेग कमी झाल्याने सध्याची पिढी बहुरूपींना ओळखतही नाही. मात्र, चव्हाण यांनी सदरची कला जोपासल्याने सर्वांनीच त्यांचे कौतुक केले. आजही बहुरुपी कलेला नाव ठेवले जातात. माझ्या मुलांनी इकडे वळू नये, यासाठी मी प्रयत्न करत आहे. परिणामी, शासनस्तरावर आमच्या कलेची दाद देऊन प्रमाणपत्र आणि मानधन दिले तर मुलांना घडविणे शक्य होईल.
पारंपरिक कलेतून मिळतो आनंद...
वडिलोपार्जित असलेली कला जोपासताना रोजीरोटी तर चालचतेच... त्याचबरोबर कला करताना मिळणारा आनंद पुन्हा नवी उमेद देणारा असताे. वयोमानाने जास्त फिरणे शक्य नसले, तरी ओळखीचे असलेले नागरिक रिकाम्या हाताने कधीच जाऊ देत नाहीत. हे विशेष...दिवसभरात शंभर ते दोनशे रुपये मिळतात, असे संजय चव्हाण यांनी सांगितले.