राज्यात चंदनाची लागवड अत्यंत कमी प्रमाणात होत असल्याने आणि मागणी अधिक असल्याने शासनाने सदरील प्रजातीच्या बचावासाठी तोडणीवर बंदी घातली होती. चंदनाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांना त्याची तोडणी करायची असेल तर वनविभागाकडून परवानगी घ्यावी लागत असे. परिणामी, बाजारपेठेत चंदनाला अधिक भाव मिळत असे. त्यामुळे चोरटे रात्रीच्या वेळी आणि चोरून तोडणी करून विक्री करीत असत. चंदन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना त्याची विक्री करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. त्यामुळे चंदन तोडणीसाठीचा परवाना वनविभागाऐवजी तहसीलदारांकडून मिळण्यात यावा, अशी काही वर्षांपासून मागणी होत होती.
दरम्यान, गेल्या ७- ८ वर्षांत राज्यात चंदनाची लागवड वाढली आहे. कमी पाण्यावर चांगली किंमत देणारे झाड म्हणून शेतकऱ्यांचा लागवडीकडे कल वाढला आहे. राज्यात जवळपास ५ ते ७ हजार शेतकऱ्यांनी २० ते २५ हजार एकरवर चंदनाची लागवड केली आहे. लातूर जिल्ह्यात जवळपास २५० शेतकऱ्यांनी चंदन लागवड केली आहे. चंदन लागवड वाढल्याने आणि चोरटी विक्री थांबविण्यासाठी राज्य शासनाने चंदनाची झाडे तोडण्यास मुभा दिली असल्याचे राजपत्रात स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
शासनाकडून मुभा...
पूर्वी चंदनाची झाडे तोडण्यासाठी आमच्या विभागाची परवानगी घ्यावी लागत होती. आता परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे चंदन उत्पादकांना कधीही आपली चंदनाची झाडे तोडून विक्री करता येणार आहे.
- एम.आर. गायकर, विभागीय वन अधिकारी.
शेतकऱ्यांची अडचण दूर...
पूर्वी शेतकऱ्यांना १५ ते २० वर्षे चंदनाची झाडे तोडता येत नव्हती. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांची अडचण होत असे. आता कधीही चंदनाची झाडे तोडून विक्री करता येणार आहे. राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, असे चंदन उत्पादक शेतकरी धनंजय राऊत यांनी सांगितले.