महाराष्ट्राच्या सीमेवरील उदगीरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मराठवाड्यातील मोठी बाजारपेठ आहे. येथील बाजारात शेजारील कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश तसेच नांदेड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक होत असते. मागील काही वर्षांपासून बाजार समितीत शेतकऱ्यांच्या शेतमालातून खरेदीदार व्यापारी हे नमुन्याच्या नावाखाली धान्य घेऊन जात असत. तसेच हमालांना शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजन झाल्यानंतर मातरेच्या नावाखाली धान्य द्यावे लागत होते. ही प्रथा बंद करण्यात यावी, म्हणून बाजार समितीकडे विविध सामाजिक संघटना व शेतक-यांनी वेळोवेळी मागणी केली होती.
दरम्यान, १७ फेब्रुवारीपासून मार्केट यार्डातील हमालांनी व्यापारी लेव्ही भरत नसल्याच्या कारणावरुन काम बंद आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे हमाल व व्यापा-यांत संघर्ष सुरू झाला. त्यातच व्यापाऱ्यांनी हमालांना मातरे देणार नाही, अशी भूमिका घेतली. परिणामी, येथील बाजार सलग पाच दिवस बंद राहिला.
रविवारी बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर पाटील, उपसभापती रामराव बिरादार, संचालक सुभाष धनुरे, गौतम पिंपरे, हमाल गाडीवान संघटनेचे प्रतिनिधी उत्तम भालेराव, शरणाप्पा सूर्यवंशी, श्रीरंग कांबळे, आडत असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी घोगरे व त्यांचे पदाधिकारी, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष सुदर्शन मुंढे, लक्ष्मीकांत चिकटवार व त्यांच्या सहका-यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. बाजारपेठेत येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या भूमिकेतून शेतक-यांच्या शेतमालातून व्यापाऱ्यांनी नमुना घेऊ नये तसेच हमालांना मातरेच्या स्वरूपात धान्य देऊ नये. त्याऐवजी रोखीने मोबदला देण्यावर एकमत झाले. त्यानंतर दुपारी ३ वा. बाजार सुरू झाला.
शेतक-यांचा फायदा होणार...
अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या शेतमालातून नमुना व मातरे घेण्याची प्रथा होती. ती आजपासून बंद झाली. हा निर्णय घेण्यासाठी व्यापारी व हमालांनी दिलेल्या सहकार्यामुळे शेतक-यांचा फायदा होणार आहे.
- सिध्देश्वर पाटील, सभापती, बाजार समिती.
शेतकरी हिताचा निर्णय...
शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वजन झाल्यानंतर मातरे देण्यावेळी बऱ्याचदा शेतकरी व आमच्यात वाद होत होता. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असो.
व्यवहारासाठी निर्णय...
मातरे बंद करण्याचा निर्णय काही हमालांना पटणारा नसला तरी शेतकऱ्यांच्या हितासाठी व बाजार सुरळीत होण्यासाठी हमालांनी तो मान्य केला आहे.
- गौतम पिंपरे.
योग्य निर्णय झाला...
अनेक वर्षांपासून चालू असलेला धान्य देण्याचा प्रकार आजपासून बंद झाल्याने ही पद्धत अवलंबण्यासाठी आमच्या हमाल बांधवांना वेळ लागेल. परंतु, हा निर्णय योग्य आहे. आमचा त्यास पाठिंबा कायम राहिल.
- उत्तम भालेराव, अध्यक्ष, हमाल मापाडी संघटना.