बैठकीस उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार शोभा पुजारी, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, मुख्याधिकारी वसुधा फड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर.आर. शेख, भूमी अभिलेख उपअधीक्षक मनीषा काटकर, वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश शेवाळे आदी उपस्थित होते.
यावेळी आ. अभिमन्यू पवार यांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी आरोग्य यंत्रणेद्वारे जनजागृती करावी, अशा सूचना करून रक्तपेढी व कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेसाठी पाठपुरावा सुरू आहे, असे सांगितले. प्रत्येक गावात दहनभूमी व दफनभूमी आवश्यक आहे. त्यासाठी पंचायत समितीने तत्परतेने काम करावे. तालुक्यात १०२ सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ६६ विहिरींचे काम पूर्ण झाले आहे. यापैकी ४३ विहिरींना मुबलक पाणी लागले आहे. तसेच वैयक्तिक ३६२ विहिरींच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. शेतरस्ते व पाणंद रस्त्याचे मातीकाम झालेल्या ठिकाणी खडीकरण व मजबुतीकरणास प्राधान्य द्यावे. शिवरस्ते कामासंदर्भात मोजणी कार्यालयाचे दोन कर्मचारी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तालुक्यात १०५ पैकी १३ पाझर तलावांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यापैकी ६ मंजुरी मिळाली असून, ७ प्रस्ताव मंडळ स्तरावर आहेत. मंजुरीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी. आपण पाठपुरावा करू, असे आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.