निलंग्यात दुसऱ्या दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला. दवाखाने, मेडिकल दुकाने व पेट्रोल पंप वगळता सर्वच व्यापार बंद होते. शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी शासन नियमांचे पालन करीत व्यापार संपूर्णतः बंद ठेवले होते. दरम्यान, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत व्यापार सुरु करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे व्यापाऱ्यांनी केली आहे. आठवड्यातील किमान चार दिवस तरी सर्वच व्यापाऱ्यांना परवानगी द्यावी अथवा दुपारी २ वाजेपर्यंत व्यापार करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी येथील व्यापाऱ्यांनी केली आहे.
सध्या शहरातील चौका- चौकात पोलिसांचे कडक पहारे असून शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी झाली आहे. सोमवारपासून व्यापाराबाबत कोणते निर्बंध येणार आणि कोणत्या व्यवहाराला सवलत मिळणार, याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागून आहे.