राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून, विविध जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला होता. त्यानुसार शुक्रवारी येथील पोलीस ठाण्यात तहसीलदार अतुल जटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील व्यापारी असोसिएशन तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन दिवस दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात यावा असे आवाहन करण्यात आले. त्यानुसार शनिवारी येथील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच रविवारीही बंद पाळण्यात येणार असल्याचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश गलबले यानी सांगितले. नागरीकांनी आत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक कदम, नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर.एन. पत्रीके, गुप्तचर विभागाचे शाम येडले पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विठ्ठल पाटील, नरेंद्र शिवणे, मधुकर धुमाळे, अशोक कोरे, ओमप्रकाश गलबले, बालाजी येरमलवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.