निलंगा तालुक्यातील परिसरात यावर्षी चांगला पाऊस झालेला असून, तेरणा व मांजरा नदीसह इतर साठवण क्षेत्र पाण्याने पूर्णपणे भरुन आहेत. त्यामुळे सुरुवातीला थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, मध्यंतरी ढगाळ वातावरण जास्त कालावधी राहिल्याने काळी काळासाठी थंडी कमी झाली होती. हिवाळ्याच्या शेवटच्या मोसमात पुन्हा उत्तर भारतात तापमान निचांकी झाले आहे. परिणामी, थंडी वाढल्याने या परिसरातून थंड वारे मराठवाड्यात पोहचले आहे. शिवाय, ढगाळ वातावरण कमी झाल्याने थंडीने पुन्हा जोर धरला असून, गत चार दिवसात दररोज तापमानाचा पारा कमी होत आहे. मंगळवारी येथील हवामान केंद्रावर 7.5 किमान तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक गरम कपडे परिधान करत आहेत. तर ग्रामीण भागात ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. कमाल तापमान दुपारी वाढलेले आहे तर रात्री पहाटे किमान तापमानात कमालीची घट येत असल्याने वातावरणात असमतोल निर्माण झाला आहे. यातून थंडी तापीचे रुग्ण वाढले आहेत. नागरिकांसह पुशधन या तापमानामुळे आजारी पडत आहेत. औराद शहाजानी हवामान केंद्रावर नोंदी ९ फेब्रुवारी राेजी किमान तापमान ७.५ कमाल तापमान २६ अंशावर पाेहचला आहे. ८ फेब्रुवारी किमान तापमान ८.५ कमाल २६ अंश, ७ फेब्रुवारी किमान ११ कमाल २६ अंशावर पाेहचला हाेता. ६ फेब्रुवारी किमान १२.५ कमाल २६ अंशाची नाेंद झाल्याचे हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे म्हणाले.
पिकांना थंडी बाधल्याने वाढ खुंटली...
किमान तापमान दहा अंशाच्या आत आल्याने पिकांची वाढ खुंटली असून, फुल गळती होत असल्याचे कृषी सहाय्यक अजय रावते म्हणाले.
दुधाळ जनावरावरही परिणाम झाला आहे. थंडीमुळे दूध उत्पादनात घट झाली असून, दररोज पाच ते दहा जनावरेही पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी येत असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डा. चव्हाण म्हणाले. कँल्शियमची कमतरता भासत आहे. आणखी तीन दिवस थंडी राहणार आहे. तर थंडीचा वाढलेला कडाका पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. यानंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होणार असल्याने थंडीचा जोर कमी होईल.