उदगीर : अलिकडील काळात तरुणांचे वाचनाकडेे दुर्लक्ष होत आहे. मोबाईल व इंटरनेटचा वापर वाढल्याने तरुणांची जीवनशैली बदलली आहे. परिणामी, तरुणांना वाचनाची सवय लागावी, यासाठी येथील ‘कारवाँ’च्यावतीने शहरातील दुधिया हनुमान मंदिर परिसरात वाचन कट्टा सुरू करण्यात आला आहे.
उदगीर हे ऐतिहासिक शहर असून, वाचन चळवळ सशक्त करण्यासाठी येथील कारवाँ या सामाजिक संघटनेने दुधिया हनुमान मंदिर परिसरात वाचन कट्टा निर्माण केला आहे. याठिकाणी एक पत्र्याचा मोठा बॉक्स तयार करण्यात आला आहे. त्यात वाचन साहित्य ठेवण्यात आले आहे. येथे येणाऱ्या तरुणांना, वयोवृद्ध नागरिकांना मंदिर परिसरात बसण्यासाठी चांगली आसन व्यवस्था उपलब्ध आहे. त्याचवेळी येथे येणाऱ्या नागरिकांना काहीतरी वाचायला मिळाले पाहिजे आणि वाचन संस्कृती वाढली पाहिजे, या हेतूने कारवाँ संघटनेने येथे ‘कारवाँ वाचन कट्टा’ सुरू केला आहे. या वाचन कट्ट्यामुळे वाचन चळवळ सशक्त होऊन प्रत्येकामध्ये वाचनाची गोडी वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. उदगीर शहरातील नागरिकांसाठी दुधिया हनुमान मंदिर परिसरात कारवाँ वाचन कट्ट्याचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. यावेळी कारवाँ संघटनेचे ओमकार गांजुरे, अदिती पाटील, सलोनी देवने, आर्या मोरे, जशन डोळे, आशिष धनुरे, अर्चना पैके, अमोल घुमाडे, शुभम पाटील, विरेश बारोळेे, अजित राठोड, करण रेड्डी, गुरूप्रसाद पांढरे उपस्थित हाेते. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी शहरातील नागरिकांनी घरात वाचूूून झालेली पुस्तके, कादंबरी, मासिके आणि दिवाळी अंक कारवाँ वाचन कट्ट्याला आणून द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.