जळकोट तालुक्यातील देवनगर तांडा हे ५० उंबरठ्यांचे असून, ३०० लोकसंख्या आहे. तांड्यावरील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने मोठी अडचण होत आहे. पावसाळ्यात तर कसरत होत असते. दुचाकीही नेता येत नाही. तांड्यावरील एखादा व्यक्ती आजारी पडल्यास अथवा गरोदर मातेस अक्षरश: बाजेवरून दवाखान्यास घेऊन जावे लागते. त्यामुळे तांड्यावरील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या तांड्यासाठी रस्ता तयार करण्यात यावा, अशी सातत्याने मागणी करूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
अखेर संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे. सरपंच ज्योत्स्ना सत्यवान पाटील, उपसरपंच सुनील राठोड, व्यापारी संघटनेचे रामदास पाटील, नबी शेख शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष सत्यवान दळवे पाटील, बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब पाटील, बालाजी दळवे, सत्यवान पांडे आदींची उपस्थिती होती.
रस्ता तयार करावा...
देवनगर तांड्यास रस्ता नसल्याने तांड्यावरील नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. आजारी व्यक्तींना तर बाजेवरून दवाखान्यास घेऊन जावे लागते. प्रशासनाने पाहणी करून मग्रारोहयोंतर्गत रस्ता करून डांबरीकरण करावे. गावास एसटी महामंडळाची बस सुरू करावी. तालुक्यात अशा प्रकारचे २० पेक्षा अधिक तांडे आहेत, त्यामुळे त्यांचा सर्व्हे करावा, अशी मागणी सरपंच ज्योत्स्ना पाटील यांनी केली.