लातूर शहरात विना मास्क फिरणारे नागरिक, फेरीवाले यांचे वाढते प्रमाण आणि रुग्णांची संख्या लक्षात घेता मनपा प्रशासनाकडून विनामास्क फिरणाऱ्या नागरिकावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. दंडात्मक कारवाईनंतर संबंधित व्यक्ती दंड भरून पुन्हा विना मास्क शहरात बिनदिक्कतपने फिरत. यावर काही प्रमाणात अंकूश राखला जावा, संबंधित नागरीक विनामास्क फिरणार नाही याकरिता दंडात्मक कारवाई झालेल्या व्यक्तीला लातूर मनपा प्रशासनाकडून एक मास्क मोफत देण्यात यावा, अशा प्रकारची विनंती वजा सूचना शहरातील प्रबुद्ध नगर भागातील विकास सूर्यवंशी यांनी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. त्यानुसार लातूर शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरीकावर दंडात्मक कारवाई करण्यासोबतच संबंधितास लातूर मनपाकडून एक मास्क मोफत दिला जावा, अशा सूचना पालकमंत्री अमित देशमुख यांनी लातूर शहर मनपा आयुक्त अमन मित्तल यांना करीत तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मनपाच्या वतीने कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे.
विनामास्क फिरणाऱ्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST