जळकोट : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधांची वाणवा निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पाणीपुरवठा नाही. तसेच पदवीधर शिक्षकांची काही पदे रिक्त आहेत. याशिवाय, ५० पेक्षा जास्त वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. त्यामुळे पालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
जळकोट तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ६५ शाळा आहेत. या शाळांपैकी काही ठिकाणी पदवीधर शिक्षकांची तीन पदे रिक्त आहेत. तसेच मुख्याध्यापकांची तीन पदे रिक्त आहेत. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचे पद रिक्त आहे. काही गावातील शाळांच्या वर्गखोल्या नादुरुस्त आहेत. ५० पेक्षा जास्त शाळा खोल्या नादुरुस्त असल्याने विद्यार्थ्यांना पटांगणात शिक्षण घ्यावे लागते.
तालुक्यातील २२ शाळांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत अद्यापही नळ कनेक्शन देण्यात आले नाही. १४ शाळांमध्ये गॅस कनेक्शन अद्याप नाही. ३८ शाळातील वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला आहे. परिणामी, तेथील संगणक धूळखात पडून आहेत. वीजपुरवठ्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून ४१ शाळांनी अनामत रक्कम भरली आहे. परंतु, अद्यापही वीज जोडणी देण्यात आली नाही. शाळांमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी पालकांतून करण्यात येत आहे.