लातूर : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सर्वाधिक रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यामुळे अनेक खासगी व सरकारी रुग्णालयांतील बेड रिकामे आहेत. लागण झालेल्या रुग्णांपैकी सौम्य लक्षणाचे सर्वाधिक आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गृहविलगीकरणात उपचार आहेत.
लातूर शहर व जिल्ह्यात ४ हजार ११ उपलब्ध बेड आहेत. त्यापैकी ५९९ रुग्णांची रुग्णालयात भरती आहे. ३ हजार ३४४ बेड शिल्लक आहेत. सद्य:स्थितीत २०३५ रुग्ण जिल्ह्यात उपचार घेत आहेत. त्यापैकी ५९९ रुग्ण रुग्णालयात आहेत तर १ हजार ४३६ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्यांपैकी १३ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. ऑक्सिजनवर ९३ रुग्ण आहेत. आयसीयूमध्ये ६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मध्यम लक्षणाची परंतु अधून-मधून ऑक्सिजनची गरज असलेले १२१ रुग्ण आहेत तर १८११ रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत. दाखल असलेल्या रुग्णांची प्राप्त स्थिती लक्षात घेता सुदैवाने सौम्य लक्षणाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्य संस्थेकडे बेड शिल्लक आहेत.
खासगी रुग्णालयांमध्ये जनरल बेडसाठी दिवसाला ४ हजार रुपये, ऑक्सिजनसह आयसीयू ७५०० रुपये, आयसीयूसह व्हेंटिलेटरची सोय असलेल्या ठिकाणी ९००० रुपये दिवसाला मोजावे लागतात; परंतु, सद्य:स्थितीत खासगी रुग्णालयात जवळपास ११५ च्या आसपास रुग्ण ॲडमिट आहेत. त्यामुळे राखीव खाटा नावालाच आहेत.