रेणापूर तालुक्यातील पानगाव व परिसरातील नागरिकांना शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून शासनाने जीवन प्राधिकरणामार्फत भंडारवाडी मध्यम प्रकल्पावरून पानगाव दहा खेडी योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत पाथरवाडी येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या केंद्रावरून पानगावसह परिसरातील गावांना पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांची होणारी भटकंती थांबली.
पानगाव हे रेणापूर तालुक्यातील मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. गावची लोकसंख्याही अधिक आहे. त्यामुळे गावची तहान या योजनेवर भागत असे. दरम्यान, या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांनी नियमितपणे महावितरणकडे वीजबिलाचा भरणा केला नाही. त्यामुळे महावितरणने सातत्याने पानगाव, खरोळा, घनसरगाव, मुरढव, फावडेवाडी, नरवटवाडी, आदी ग्रामपंचायतीकडे थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन करून सूचना केल्या. परंतु, त्याकडे ग्रामपंचायतींनी दुर्लक्ष केल्याने अखेर महावितरणने जलयोजनाचा पाणीपुरवठा तोडला आहे. त्यामुळे आठ दिवसांपासून या योजनेवर अवलंबून असलेल्या गावांवर जलसंकट ओढवले आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
३ लाखांचा भरणा करण्याचा निर्णय
महावितरणने १ कोटी ४२ लाखांच्या थकीत वीज बिलापोटी २० फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा तोडला आहे. त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय पाहून पाणीपुरवठा शिवार समितीची बैठक सरपंच सुकेश भंडारे यांनी घेऊन महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यासोबत खंडित वीजपुरवठ्यासंदर्भात चर्चा केली. तेव्हा थकीत वीज बिल भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही, असे सांगितले. त्यामुळे ग्रामपंचायतीने तीन लाख रुपयांचा भरणा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी सांगितले.
नागरिकांनी पाणीपट्टी भरणा करावा
महावितरणची १ कोटी ४२ लाख ४३ हजारांची थकीत बाकी आहे. वीजपुरवठा तोडल्याने गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दोन दिवसांत काही रक्कम भरण्यात येणार आहे; परंतु, गावातील नागरिकांनी आपल्याकडे असलेली पाणीपट्टी भरावी, असे आवाहन सरपंच सुकेश भंडारे, ग्रामविकास अधिकारी गोपिनाथ टकले यांनी केले आहे.