शिरूर अनंतपाळ तालुक्यात महावितरणच्या वीजबिलाची मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने वसुली मोहीम सुरू केली आहे. थकीत वीजबिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना लाभ मिळावा यासाठी कृषी धोरण २०२० योजना जाहीर केली आहे. त्याला प्रतिसाद मिळत असला तरी अपेक्षित वसुली होत नसल्याने महावितरण कार्यालयाकडून ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने खंडित केला जात आहे. तालुक्यात जवळपास ८०० ट्रान्स्फॉर्मर आहेत. यापैकी २५० ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे ऐन हंगामात विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने येथील महावितरणच्या कार्यालयात थकीत वीजबिल भरण्यासाठी ग्राहकांनी शुक्रवारी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात १५ लाख १९ हजारांची थकबाकी वसूल झाली.
तालुक्यातून २४ कोटींची वसुली अपेक्षित...
शिरूर अनंतपाळ तालुक्यात ६५० कृषी ट्रान्स्फॉर्मर आहेत, तर १५० गृह विद्युत ट्रान्स्फॉर्मर असे एकंदरीत ८०० ट्रान्स्फॉर्मर असून, कृषी धोरण २०२० नुसार २४ कोटी रुपयांच्या थकबाकीची वसुली अपेक्षित आहे. त्यामुळे ट्रान्स्फॉर्मरचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असून, २५० ट्रान्स्फॉर्मरचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला असल्याने थकीत वीजबिलाचा भरणा करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
भरणा करणाऱ्यांची तत्काळ जोडणी...
थकीत वीजबील तातडीने भरण्यात यावे, यासाठी ट्रान्स्फॉर्मरचा विद्युतपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ज्या ग्राहकांनी अपेक्षित वीजबिलाचा भरणा केला आहे त्यांची तत्काळ वीजजोडणी करण्यात येत असल्याचे येथील उपविभागीय अभियंता जोंधळे, कत्ते, नागराळे यानी सांगितले.
कृषी धोरणाचा लाभ घ्यावा...
विद्युत बिलाच्या थकीत ग्राहकांना लाभ मिळावा, म्हणून शासनाने कृषी धोरण २०२० ही योजना सुरू केली आहे. त्यामुळे या कृषी धोरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जोंधळे, कत्ते यांनी केले आहे.