अहमदपूर आणि चाकूर तालुक्यात १४८ गावे असून, गावनिहाय १८४ पोलीस पाटलाची पदे मंजूर आहेत. त्यातील अमदपूर तालुक्यातील १२१ गावांसाठी ६० पोलीस पाटील सध्याला कार्यरत असून, ६१ जागा रिक्त आहेत. तर चाकूर तालुक्यातील ६३ पैकी ३२ गावात पोलीस पाटील कार्यरत आहेत. ३१ ठिकाणची पदे रिक्त आहेत. जवळपास ९२ गावामध्ये पोलीस पाटील यांची पदे रिक्त आहेत. २०१५ पासून सदर पदे भरण्यात आली नाहीत. परिणामी, गावात कायदा आणि सुव्यवस्थेबाबत अडचणी निर्माण हाेत आहेत. पोलीस पाटील गावचे प्रमुख असून, महसूल व पोलिस प्रशासनाला याेग्य माहिती देणारा दुवा समजला जाताे. त्यांच्यावर गावाची जबाबदारी असून, गावातील वाद मिटविण्याचे काम पाेलीस पाटील करतात. काेराेनाच्या काळात रुग्णांना काेविड केअर सेंटरमध्ये नेणे, आशा कार्यकर्तीला सहकार्य करणे आदी कामेही पाेलीस पाटलांनी केली आहेत. मात्र, अहमदपूर उपविभागातील मंजूर पदापैकी ९२ पदे अद्यापही भरण्यात आली नाहीत. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अनेक गावातील छोटे-मोठे तंटे थेट पोलिस ठाण्यात दाखल हाेत आहेत. शिवाय, महसूल विभागाकडेही दाखल हाेत असल्यामुळे डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने रिक्त गावातील पदे भरावीत, अशी मागणी पोलिस पाटलांच्या वतीने करण्यात आली आहे. अहमदपूर तालुक्यातील मोठ्या गावातील शिरूर ताजबंद, शिवणखेड, वायगाव, रोकडा सावरगाव, काजळ हिप्परगा या गावासारखी अनेक गावे पोलीस पाटलांविनाच आहेत. तर चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ, घरणी, मुळेगाव, नायगाव, चापोली आदी गावांतही पाेलीस पाटील नाहीत. पोलीस पाटील नसल्यामुळे दररोज तंटे वाढत आहेत.
पाेलीस पाटलांची भूमिका महत्वाची...
महसूल आणि पोलीस प्रशासनातील दुवा म्हणून पाेलीस पाटील यांची भूमिका महत्वाची आहे. गावातील छाेटे-छाेटे वाद, तंटे गावपातळीवर मिटविण्यासाठी पाेलीस पाटील पुढाकार घेतात. गावातील वाद आणि इतर माहिती पाेलीस पाटील प्रशासनाला देतात. गावात पोलील पाटीलच नसल्यामुळे अनेक गावात भांडण-तंटे वाढले आहेत. पाेलीस पाटील यांची रिक्त भरण्यात यावीत, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी यांनी केली.
शासन आदेशानुसार पदभरती...
अहमदपूर उपविभागात पोलीस पाटलांची जवळपास ९२ पदे अद्यापही रिक्त आहेत. मात्र, जवळच्या गावातील पाेलीस पाटलांना येथील गावांचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. परिणामी, कायदा आणि सुव्यवस्थेचा सध्यातरी प्रश्न नाही. भरतीचा अधिकार शासनाच्या निर्देशानुसारनुसार होणार असल्याचे अहमदपूर येथील उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.