जळकाेट तालुक्यातील रावणकोळा, देवनगर तांडा, राठोडतांडा येथील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे संबंधित प्रशासनाचे गत अनेक महिन्यांपासून दुर्लक्ष हाेत आहे. याबाबत १२ मार्च रोजी रावणकोळा येथील सरपंच ज्योत्स्ना पाटील, उपसरपंच सुनील राठोड, व्यापारी संघटनेचे रामदास व्यंकटराव पाटील, नबी शेख यांच्या नेतृत्वाखाली देवनगरतांडा आणि राठोडवाडी तांडा येथील बंजारा समाजबांधवांनी जळकाेट येथील गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची भेट घेत निवेदन दिले. उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात या गावाला जाण्यासाठी रस्ताच नाही. सध्या या रस्त्यावरुन साधी मोटरसायकलही जात नाही. बैलगाडीनेही प्रवास करता येत नाही. रात्री-अपरात्री रुग्णला खाटेचा वापर करुन जळकाेटला उपचारासाठी नेण्याची वेळ गावकऱ्यांवर, नातेवाइकांवर आली आहे. परिणामी, काही रुग्णांना आपला प्राण वाटेतच गमवावा लागताे. अशा अनेक घटना टाळण्यासाठी शासन आणि प्रशासनाने याकडे लक्ष देवून, रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. मात्र, या मागणीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले जात आले, असा आराेप संतप्त नागरिकांतून केला जात आहे. सदर स्त्याची पाहणी करुन, महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत डांबरीकरण करण्यात यावे, गावाला रस्ता करावा, महामंडळाची एस.टी. बससेवा सुरु कराावी, अशी मागणीही शिष्टमंडळातील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. देवनगरतांडा, रावणकोळातांडा, राठोडवाडी तांडा, बालाजीतांडा अशा अनेक तांड्यावरील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जळकोट तालुक्यातील २० पेक्षा अधिक तांड्याची पाहणी करुन, रस्त्यांच्या कामाला मंजुरी द्यावी, या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, अशीही मागणी सरपंच ज्योत्सना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष सत्यवान दळवी पाटील, रामदास पाटील, जळकाेट बाजार समितीचे उपसभापती बाळासाहेब पाटील दळवी, बालाजी दळवी, सत्यवान पांडे, सुनील राठोड आदींनी केली आहे.
रावणकोळातांडा-देवनगरतांडा रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST