किनगाव बाजारपेठेचे गाव असल्याने परिसरातील वाडी-खेड्यातील हजाराे नागरिक दैनंदिन बाजारहाटसाठी येतात. किनगाव हे गाव अहमदपूर ते अंबाजोगाई राज्यमहामार्गावर असल्याने, येथून लांबपल्ल्यांच्या जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या थोडा वेळ थांबून पुढे मार्गस्थ होतात. त्यामध्ये अहमदपूर- औरंगाबाद, अहमदपूर-बीड, मुंबई, पुणे, जालना, परभणी, गंगाखेड, जिंतूर आदी ठिकाणी जाणाऱ्या बसेस किनगावातून जातात. स्थानकामध्ये सातत्याने प्रवाशांची रेलचेल असते. बसस्थानकाभोवती संरक्षण भिंत असून, जागोजागी कठडे फोडून लोकांनी पायवाट केली आहे. शौचालयाचा अभाव असून, ते केवळ नावालाच उरलेले आहे. सुविधा असून अडचण...आणि नसून खोळंबा... अशी अवस्था झाली आहे. परिणामी, महिला प्रवाशी आणि मुलींची हेळसांड हाेत आहे. बसस्थानक परिसराला काटेरी झुडपांनी वेढले आहे. बसस्थानकात जागोजागी खड्डे पडल्याने गिट्टी उघडी पडली आहे. ती प्रवाशांना उडून लागण्याचा धोका अधिक आहे. बसस्थानकामध्ये पाण्याची टाकी बांधण्यात आली असून, ती झाडाझुडपांनी वेढले आहे. पाण्याच्या टाकीला जागोजागी तडे गेले आहेत. टाकीच तहानलेल्या अवस्थेत आहे. या टाकीची दुरवस्था झाली असून, प्रवाशांना पाणी पिण्यासाठी आजूबाजूच्या हॉटेलचा आधार घ्यावा लागत आहे. बसस्थानकातील घाणीचे साम्राज्य दूर करून, प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी हाेत आहे.
किनगाव बसस्थानकाची दुरावस्था; घाणीचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST