लातूर : नूतन वर्षात पेट्रोलच्या दराने विक्रम प्रस्थापित केला असून, लिटरला ९२.७८ पैसे मोजावे लागत आहेत. गतवर्षीपेक्षा सहा रुपये यंदा वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ पोहोचत आहे. या दरवाढीच्या विरोधात पक्ष - संघटनाही मूग गिळून गप्प आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेसारख्या काही पक्ष- संघटनांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही पक्ष संघटनेने आंदोलन केल्याचे दिसले नाही.
पेट्रोल, डिझेलची दरवाढ सर्वसामान्यांना नुकसान पोहोचविणारी आहे. ही दरवाढ केवळ इंधनपुरती मर्यादित नाही, ट्रान्स्पोर्टवर आधारित व्यवस्थेला झळ पोहोचविणारी आहे.
पेट्रोल-डिझेलची दरवाढ महागाईला कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या दरवाढीचा निषेध करून आंदोलन केले आहे. केंद्र शासनाने ही दरवाढ मागे न घेतल्यास यापुढील काळामध्ये पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. - मकरंद सावे,
राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष
पेट्रोल-डिझेल दरवाढीची झळ सर्वाधिक सर्वसामान्यांना बसणार आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे वाहतुकीसह अन्नधान्य व तेलाचे भाव वधारले आहेत. त्यामुळे या दरवाढीचा सर्वाधिक फटका गोरगरिबांना बसत आहे. सरकारला या बाबीचे देणेघेणे नाही. या विरोधात वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन छेडेल.
- संतोष सूर्यवंशी, वंचित आघाडी