शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन
लातूर : कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हाॅल येथे एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. उपस्थितीचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
जिल्ह्यात रिकव्हरी रेट ९५.४८ टक्के
लातूर : जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असून, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.४८ टक्क्यांवर पोहोचले आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड आणि प्रयोगशाळेतील चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. सध्या ३५९ जणांवर उपचार सुरू असून, यापैकी २०० हून अधिक रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत ६८८ जणांचा कोरोनाने बळी घेतला असून, मृत्यूदर २.९ टक्क्यांवर आहे.
लाहोटी कन्या विद्यालयात कार्यक्रम
लातूर : येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात रोटरी क्लब लातूर मिडटाऊनच्या वतीने अभिवाचन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनुप देवणीकर, किरण दंडे, रविंद्र बनकर, उमा व्यास, डाॅ. जयंती आंबेगावकर, सुनीता कुलकर्णी, अर्चना पाठक, ऋतुजा सूर्यवंशी, दीया मगर, दीपाली खांडेकर, रोहिणी पाचंगे, भक्ती खरे, प्रतीक्षा थोरात, माहेश्वरी म्हेत्रे, मुख्याध्यापिका सुनीता बोरगावकर, सुनंदा कुलकर्णी, अचला कदम आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.
संत सावता विद्यालयात विविध उपक्रम
लातूर : बार्शी रोडवरील पाखरसांगवी येथील संत सावता पूर्व प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त उपक्रम घेण्यात आले. माजी केंद्रप्रमुख शिवाजीराव दंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. आरोही गोडबोले, आर्यन जोगदंड, विराज शेख या विद्यार्थ्यांनी महापुरुषांची वेशभूषा परिधान केली होती. कार्यक्रमास प्राचार्य लक्ष्मण बादाडे, सोनाली शेख, अनिता बिराजदार, राहुल जोगदंड, प्रवीण बिराजदार, आदी उपस्थित होते.
ओबीसी ब्रिगेडतर्फे पिनाटे यांचा सत्कार
लातूर : राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी, अधिकारी महासंघाच्या राज्य समन्वयकपदी विजयकुमार पिनाटे यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओबीसी ब्रिगेडचे सुदर्शन बोराडे, मराठवाडा अध्यक्ष अजित निंबाळकर, एकनाथ पाटील, हिरालाल पाटील, अनंत पांचाळ, अशोक चव्हाण, दिलीप पिनाटे, पद्माकर गिरी आदी उपस्थित होते.
‘अग्निशमन दल कार्यालय उभारावे’
लातूर : शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या गंजगोलाईजवळ अग्निशमन दलाचे कार्यालय उभारावे, अशी मागणी शेख अब्दुल्ला रहिमसाब यांच्या वतीने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. गंजगोलाईमध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने आहेत. मागील आठवड्यात आगीची घटना घडली होती. त्यामुळे सावधानता बाळगण्याची गरज असून, जिल्हा प्रशासनाने गंजगोलाईसारख्या ठिकाणी अग्निशमन कार्यालय निर्माण केल्यास तात्काळ घटनास्थळावर पोहोचण्यास मदत होईल.
निवडणूक खर्च सादर करण्यासाठी लगबग
लातूर : ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून, निवडणूक खर्च सादर करण्याची मुदत जवळ आली आहे. त्यामुळे उमेदवारांच्या वतीने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने खर्च सादर केला जात आहे. अनेकांनी तर बिले जमा केली असून, ऑनलाईनला अडथळा येत असल्याने ऑफलाईनचा पर्याय स्वीकारला आहे. तहसीलमध्ये अर्ज स्वीकारले जात आहेत.