लातूर - शरीर तंदुरुस्तीसाठी प्रत्येक नागरिक व्यायामाचा आधार घेत असतो. व्यायामामुळे शरीराला बळकटी मिळते. यासह मनही प्रसन्न राहते. त्यामुळे व्यायामासाठी लातूरच्या क्रीडा संकुलात नेहमीच गर्दी दिसते. आता संकुल समितीने नव्याने आर्टिफिशिअल वूड डिझाइनची ओपन जीम साकारली आहे. त्यामुळे लातूरकरांच्या व्यायामाला बळकटी मिळाली आहे.
लातूरचे क्रीडा संकुल सकाळ-सायंकाळच्या सत्रात खेळ व व्यायामासाठी नेहमीच गजबजलेले दिसते. संकुलाच्या पूर्वेस असलेल्या ओपन जीमवर नागरिक व युवकांची नेहमीच गर्दी असते. त्यामुळे जिल्हा संकुल समितीने पूर्वेच्या ओपन जीमशेजारी अद्ययावत अशी दहा प्रकारच्या साहित्याची ओपन जीम नव्याने साकारली आहे. संकुल समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अमित देशमुख यांच्या निर्देशानुसार ही ओपन जीम नुकतीच संकुलात बसविण्यात आली आहे. यात लेगप्रेस, चेस्टप्रेस, शोल्डर बिल्डर, डिप्स स्टँड, सिटिंग ॲण्ड स्टँडिंग ट्विस्टर, सिटअप बेंच, मल्टीफंक्शनल ट्रेनर, एअर वॉकर, रोवर, एक्झरसायकल आदी प्रकारचे साहित्य आहे. जवळपास ७ लाख किमतीचे हे साहित्य या नव्या ओपन जीममध्ये बसविण्यात आले आहे. सकाळ, सायंकाळच्या सत्रात या ठिकाणी हजारो लोक ओपन जीमचा व्यायामासाठी वापर करत असत. त्यामुळे संकुलात नव्याने आर्टिफिशिअल वूड डिझायनचे हे ओपन जीम साहित्य बसविण्यात आले आहे. यामुळे लातूरकरांच्या व्यायामाला चालना मिळणार आहे.
तापमानाच्या परिणामावर लागणार अंकुश...
अद्ययावत मशीन आर्टिफिशअल वूड डिझायनची असल्याने उन्हाळ्यात जास्त प्रमाणात गरम होत नाही, तर थंडीत जास्त प्रमाणात थंड होत नाही. पूर्वी ओपन जीमसाठी लोखंडी साहित्य असल्याने ते उन्हाळ्यात अधिक तापायचे तर थंडीत अधिक थंड व्हायचे. मात्र, या नव्या डिझाइनमुळे साहित्यावर तापमानाचा परिणाम होणार नाही.
नागरिकांच्या सोयीसाठी उचलले पाऊल...
सकाळ, सायंकाळच्या सत्रात हजारो नागरिक व युवक संकुलातील ओपन जीमवर शारीरिक कसरती करत. त्यामुळे या ठिकाणी गर्दी व्हायची. नागरिकांच्या व्यायामाच्या सुलभतेसाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.