लातूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईनच्या गोंधळात विद्यार्थी लिहिण्याची सवय विसरून गेले आहेत. अनेकांचे सुंदर अक्षरही बिघडले आहे. तर अनेकांच्या लिखाणावर परिणाम झाल्याच्या तक्रारी पालकांमधून होत आहेत.
शैक्षणिक आयुष्यात सुुंदर हस्ताक्षराला अधिक महत्त्व आहे. मुलांचे अक्षर सुंदर यावे यासाठी शिक्षक, पालकांचा कटाक्ष असतो. नव्हे, त्यासाठी लहानपणापासून सरावही करून घेतला जातो. यात कोणाचे अक्षर सुधारते तर कोणाचे आहे त्याच पठडीत येते. त्यात आता कोरोनामुळे ऑनलाईन एज्युकेशन सुरू झाले आहे. त्यामुळे मुलांच्या अक्षरावर मोठा परिणाम झाला आहे. दैनंदिन दोन तास ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यात मुलांना होमवर्क दिला जातो. परंतु, अनेक मुलं दिवसभर सुटी असल्याने आपल्या वेळेनुसार अभ्यास करतात. त्यामुळे मुलांच्या लिखाणाची सवय कमी झाली. अनेकांच्या लिखाणाची गतीही कमी झाली आहे. नियमित शुध्दलेखनाचा, होमवर्कचा सराव बंद पडल्याने अनेकांचे अक्षरही बिघडले आहे. मुलांचे अक्षर बिघडल्याच्या तक्रारी पालक करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी किमान सुटीमध्ये तरी हस्ताक्षराचा सराव करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांनो, हे करा...
लिखाण करताना पेनाची पकड अधिक घट्ट नसावी
अक्षरांना पूर्ण आणि समान आकारात लिहावे
अक्षर किंवा शब्दांमध्ये निश्चित जागा ठेवावी
शुध्दलेखनाचा नियमित सराव करा
मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात...
ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे हे शिकण्याचे टप्पे असले तरी सुंदर हस्ताक्षर या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा आहे. अक्षर सुधारण्याचे ठरावीक वय असते. या वयात खूप वाचणे आणि लिहिणे घडले तर अक्षरात सुधारणा होते. सुंदर हस्ताक्षरासाठी कृतिपत्रिका लिहून घेता येईल. सध्या मुले घरीच असल्याने विविध साहित्य, कामाच्या याद्या तयार करुन घेणे, लेखन स्पर्धेचे आयोजन करणे या उपक्रमांच्या माध्यमातून अक्षर सुधारण्यासाठी प्रयत्न करता येतील. उन्हाळी सुटीत सुंदर हस्ताक्षरासाठी सरावही करता येईल.
रमेश माने, भाषा विषयक सहायक, लातूर
सध्या ऑनलाईन शिक्षणामुळे मुले लिखाण करणेच विसरले आहेत. त्यामुळे पालकांनी पहिली ते दुसरीच्या पाल्यांसाठी कृतिपत्रिका लेखनासाठी द्यावी, खेळाच्या स्वरूपात लेखनकृती करण्यासाठी प्रेरित करावे, गुगल, यु-ट्युबवर सुंदर हस्ताक्षर नमुने दाखवावेत, तिसरीच्या मुलांना योग्य वळणाने, क्रमाने अक्षरे लिहिण्यास आग्रह धरावा, मुले मोठी होतील तसे हस्ताक्षराचे महत्त्व सांगावे, खेळाच्या स्वरूपात सुंदर हस्ताक्षरासाठी सराव करून घेतल्यास नक्कीच सुधारणा होईल.
प्रभाकर हिप्परगे, डायट, लातूर
पालक म्हणतात...
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मुले ऑनलाईन अभ्यासावर भर देत आहेत. परिणामी, हस्ताक्षर बिघडले आहे. त्यामुळे उन्हाळी सुटीत सुंदर हस्ताक्षरासाठी पाल्याचा सराव घेणार आहे. सोबतच ऑनलाईन पद्धतीने सुंदर हस्ताक्षरांबाबत मार्गदर्शन वर्गाला उपस्थित राहण्याच्या सूचना करणार आहे. - रितेश अवस्थी, पालक
नियमित शाळा सुरू असताना मुले नियमित लिखाण करीत होते. मात्र, गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे लिखाणाचा सराव बंद झाल्याने मुलांचे अक्षर बिघडले आहे. काहींची तर लिहिण्याची गतीही कमी झाली आहे. त्यामुळे पाल्यांच्या सुंदर हस्ताक्षरासाठी दररोज सराव घेणार आहे. - नंदकुमार भोसले, पालक