कुंभारवाडी शिवारातून पशुधनाची चोरी
लातूर : शेतातील दावणीला बांधण्यात आलेले पशुधन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उदगीर तालुक्यातील कुंभारवाडी-सताळा शिवारात शुक्रवारी घडली. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी भानुदास बाबाराव गुडे (७०, रा. कुंभारवाडी, ता. उदगीर) यांनी आपल्या शेतात दोन म्हशीचे वगार चारापाणी करून झाडाखाली बांधून घरी गेले होते. दरम्यान, दावणीला बांधलेल्या दोन वगार (किंमत २५ हजार रुपये) हे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञाताविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उदगीरसह देवणी, निलंगा या सीमावर्ती भागातील तालुक्यात पशुधन चोरीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. मात्र, चोरट्यांचा सुगावा लागत नसल्याने शेतकरी आणि पशुपालक त्रस्त आहेत.
भरधाव दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी
लातूर : भरधाव मोटारसायकलने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाल्याची घटना देवणी तालुक्यातील तळेगाव मार्गावर घडली. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात या मोटारसायकल चालकाविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, फिर्यादी स्वरूप भुजंगराव भंडे (वय ५१, रा. आनंदवाडी, ता. देवणी) हे आपल्या मित्रांसह दुचाकीवरून (एमएच २४ एफ ७७५३) तळेगाव (बु.) मार्गे वलांडीकडे येत होते. दरम्यान, दुसऱ्या मोटारसायकलने (एमएच २४ एसी ९८७) समोरून जोराची धडक दिली. हा अपघात ६ एप्रिल रोजी तळेगाव मार्गावर झाला आहे. या अपघातात मित्रासह फिर्यादी जखमी झाला आहे. याबाबत देवणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मोटारसायकल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.