लातूर : स्पंदन अक्षय संजीवनी योजनेंतर्गत लातूर जिल्ह्यात वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी नेहरू युवा केंद्राचे सेवानिवृत्त अधिकारी मोहन गुलाबगीर गोस्वामी यांनी एक लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे सुपूर्द केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या या कार्यक्रमात सेवानिवृत्त अधिकारी मोहन गोस्वामी, सुनंदा गोस्वामी, प्रकल्पाचे प्रमुख डॉ. विश्वास कुलकर्णी, डॉ. अशोक आरदवाड व त्यांच्या टीमचे सदस्य तसेच नेहरू युवा केंद्राचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ऑक्सिजन प्रकल्पासाठी माझ्या सेवानिवृत्तीच्या बचतीमधून एक लाख रुपयांचा धनादेश देत आहे. गतवर्षी पीएम केअर फंडाला एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता. या अल्पशा मदतीतून ऑक्सिजन निर्मिती होऊन कोरोना रुग्णांना फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वासनगाव शिवारात श्री गुरुजी आयटीआयने यासाठी मोफत जागा दिली असून, प्लांट २५ जूनपासून सुरु होणार आहे. या प्लांटची दररोज १६० सिलिंडर उत्पादनाची क्षमता आहे.