मोबाईलची अडचण वेगळीच...
ग्रामीण भागात फिल्डवर काम करताना माहिती संकलित करण्यासाठी घरोघरी जावे लागते. काही वेळेस नेटवर्कचा अडथळा येतो. त्यामुळे तत्काळ माहिती भरणे अवघड जाते. काही सेविकांचे मोबाईल नादुरुस्त झाले आहेत. दुरुस्त करण्यासाठी वेळ लागत असल्याने पर्याय अवलंबावा लागत आहे. कोरोनामुळे कामाचा व्याप वाढला असून, नेटवर्कमुळे काम करताना गैरसोय होत असल्याचे अंगणवाडी सेविकांनी सांगितले.
पोषण ट्रॅकरवरील कामे...
पोषण ट्रॅकरवर जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या पोषणासंबंधीच्या नोंदी केल्या जातात. याशिवाय बालकांच्या वजन, उंची, लसीकरण, गृहभेटी, गावभेटी, कोरोना माता, किशोरवयीन मुली, निराधार मुलांची माहिती त्यात अपडेट करावी लागले. त्यात माहितीसाठी केवळ इंग्रजी भाषेचाच वापर होत असल्याने अनेक अंगणवाडी सेविकांना माहिती भरण्यात अडचणी येत आहेत.
आम्हाला इंग्रजी कशी येईल...
१५ वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहे. शासनाच्या वतीने पोषण ट्रॅकर ॲपबाबत सूचना आहेत. मात्र, इंग्रजी येत नसल्याने माहिती भरण्याची गैरसोय होत आहे. कोरोनामुळे आरोग्यविषयक कामांची जबाबदारी वाढली आहे. लहान बालके, गरोदर माता, पोषण आहार, बालकांचे लसीकरण आदींची माहिती भरावी लागते. इंग्रजी येत नसल्याने जुन्या पद्धतीनेच रजिस्टरमध्ये नोंदणी करीत आहे. ज्या अंगणवाडी सेविकांना इंग्रजी येत नाही त्यांना मराठी भाषेचा पर्याय ॲपमध्ये उपलब्ध करून देण्याची गरज आहे. - अंगणवाडी सेविका
पोषण ट्रॅकर ॲपमध्ये अनेक वेळा भाषेमुळे अडचणी आल्या. फिल्डवर काम करताना वेगाने ॲपमध्ये नोंदणी करता येत नाही. त्यामुळे फिल्डवर असताना रजिस्टरमध्ये नोंदणी करते. आणि नंतर ॲपमध्ये नाेंदणी करते. ॲप फायदेशीर आहे मात्र, भाषेचा पर्याय मराठीचा करणे गरजेचे आहे. अनेक सेविकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. शासनाने हा प्रश्न तत्काळ सोडविल्यास सेविकांना काम करणे सोपे जाईल. - अंगणवाडी सेविका
जिल्ह्यातील अंगणवाड्यांची संख्या - २,४०८
एकूण अंगणवाडी सेविका - २,३०३