येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात बोलताना आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विरोधकांचे आरोप वास्तवाला धरून नाहीत. कुठलाही पुरावा नाही. अवसायनात निघालेल्या कारखान्याची १० वर्षांत प्रगती केली. २५० मेट्रिक टन क्षमतेच्या कारखान्यात सध्या ४ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले जाते. पाच लाख ७५ हजार क्विंटल साखर उत्पादित होते. ७०० पेक्षा अधिक कर्मचारी काम करीत आहेत. कारखाना दररोज ३० हजार लिटर स्पिरीट अल्कोहोल तत्सम पदार्थाचे उत्पादन करीत आहे. त्यामुळे कारखान्याच्या उत्पन्नात भर पडली आहे. तसेच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे.
२०११ मध्ये केवळ एक लाख मेट्रिक टन उत्पन्न होणाऱ्या तालुक्यात आज ८ लाख मेट्रिक टन उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यासाठी आवश्यक सिंचन व्यवस्था माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांच्या प्रयत्नातून झाली आहे. ज्यांना कारखाना चालविण्यास दिला होता, त्यांनी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १३ कोटी ४१ लाख ३१ हजारांचे कर्ज काढून ठेवले. त्याच्या वसुलीची नोटीस संबंधितांना मिळाली आहे. चांगल्या कारखान्याला बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधकांनी चालविले आहे, असेही आ. बाबासाहेब पाटील म्हणाले.
यावेळी सिद्धी शुगरचे व्यवस्थापक प्रफुल्लचंद्र होनराव, बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंचकराव पाटील, माधव जाधव, प्रशांत देवकते, नगरसेवक फुजैल जागीरदार, अभय मिरकले, मुन्ना सय्यद, सरवरलाल सय्यद, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, दयानंद पाटील, अझर बागवान, गोपीनाथ जायेभाये, शेतकरी अनिल बेंबडे, ईश्वर कारनाळे, गणेश जाधव उपस्थित होते.
जुन्या बालाघाटचे संचालक जबाबदार...
बालाघाट कारखान्याने १० वर्षांत केवळ ५ लाख मे. टन उसाचे गाळप केले. बारदाणा ज्यादा दराने घेतला. ऊसतोड करार केले नाहीत. त्यास तत्कालीन संचालक जबाबदार होते. त्यामुळे कारखाना दिवाळखोरीत निघाला, असा आरोपही आ. बाबासाहेब पाटील यांनी केला.
ईडीला घाबरत नाही...
कारखान्यात कुठलीही अनियमितता नाही. असेल तर इतकी वर्षे विरोधक गप्प का राहिले, त्याचे उत्तर त्यांनीच द्यावे. विनाकारण ईडी चौकशीच्या धमक्या देऊ नये. आपण घाबरत नाही, असेही आ. पाटील यांनी सांगितले.