लोकसंख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला असून, त्यातच ग्रामीण भागात विभक्त कुटुंब पद्धतीला महत्त्व दिले जात आहे. अनेक गावाशेजारी असलेल्या सर्व्हे नंबरमध्ये प्लाॅटिंग करून बांधकाम करण्यात येत आहे; परंतु बांधकाम करण्यासाठी महसूल विभागाकडील आवश्यक असणारा अकृषी परवाना मात्र घेतला जात नाही. त्यामुळे महसूल प्रशासनास प्राप्त होणारा अकृषी कर बुडत आहे. यासाठी महसूल प्रशासनाने तालुक्यातील अनधिकृत ७६० अकृषीधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. तातडीने अनधिकृत अकृषी कराचा भरणा करावा, तसेच महसूल अधिनियमानुसार अकृषी परवाना घेण्यात यावा. अन्यथा ४० पट दंड आकारण्यात येईल, अशा सूचना उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी येथील महसूल प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीत केल्या आहेत. यावेळी तहसीलदार अतुल जटाळे, नायब तहसीलदार सुधीर बिरादार, आर. एन. पत्रिके, मंडळ अधिकारी श्रीरंग डोंगरे, तलाठी गणेश राठोड, सदानंद सोमवंशी, गणेश भारती यांच्यासह महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
अधिनियम ४४ प्रमाणे दंडात्मक कारवाई...
गावठाण जमिनीवर अकृषी परवाना घेऊन बांधकाम करणाऱ्या अधिकृत अकृषीधारकांनी नियमित कराचा भरणा करणे आवश्यक आहे, तर अनधिकृत अकृषीधारकांनी नियमित कराबरोबरच दंडसुद्धा भरणे आवश्यक आहे, अन्यथा महसूल अधिनियमाच्या कलम ४४ प्रमाणे ४० पट दंड आकारण्यात येऊ शकतो, त्यामुळे लवकरात लवकर कराचा भरणा करण्यात यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
१९ लाख ५८ हजारांचा भरणा अपेक्षित...
तालुक्यात ३ महसूल मंडळे आणि १७ तलाठी सजा आहेत. त्याअंतर्गत असणाऱ्या ७६० अनधिकृत अकृषीधारक आहेत. त्यामुळे त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून १९ लाख ५८ हजार १८८ रुपयांच्या भरणा होणे अपेक्षित आहे.
वसुलीसाठी पथक सज्ज...
महसूल प्रशासनाकडून आकारण्यात येणारा अधिकृत अकृषी आणि अनधिकृत अकृषी कराचा भरणा करण्यासाठी मंडळ अधिकारी तलाठी यांचे पथक सज्ज करण्यात आले असून, यामध्ये श्रीरंग डोंगरे, गणेश राठोड, सदानंद सोमवंशी, गणेश भारती यांच्यासह विविध महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.