लातूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीचा टक्का अलिकडे वाढला आहे. वेगवेगळे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा ऑनलाइन पद्धतीने घातला जातो. ना कॉल, ना ओटीपी तरीही बँकेतून पैसे गायब होण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. फ्री गेमच्या नादी लागून अनोळखी ॲप डाऊनलोड करणे आता अनेकांना महागात पडू शकते. यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.
बनावट मोबाइल कॉलच्या माध्यमातून अनोळखी व्यक्ती संपर्क साधते. त्यातून बोलत बोलत माहिती विचारते. अशावेळी माहिती देणे टाळले पाहिजे. ओटीपी आणि ॲप डाऊनलोड करणे महागात पडू शकते. ओटीपीनंबर समोरील व्यक्तीला सांगितल्याबरोबर बँक खात्यावरील पैसे परस्पर गायब होतात. अलिकडे ऑनलाइनचा गोरखधंदा जोरात सुरू आहे. बँकेतून अधिकारी बोलतोय, अशी बतावणी करून ज्येष्ठ नागरिकांसह महिलांनाही गंडविण्याचे प्रकार पोलीस दप्तरी नोंद आहेत.
पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच
उत्तर भारतातून हिंदी भाषेत बोलणाऱ्या व्यक्तींचे कॉल्स प्रामुख्याने महाराष्ट्रातील बँक ग्राहकांना येतात. फेक कंपनीच्या नावे आमिष दाखविले जाते.
सोशल मीडियातील वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून जाहिराती केल्या जातात. या जाहिरातीला बळी पडलेल्या नागरिकांना लाखो रुपयांना गंडविले जाते. तर बनावट प्रोफाईलवरूनही फसविले जाते.
गोड बोलून गोपनीय माहिती विचारून घेतली जाते. त्यानंतर फसवणूक होते. अशा घटना अलिकडे वाढल्या आहेत. अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखालीही फसविण्यात आल्याचे समोर आले आहे.
अनोळखी ॲप नकोच
सध्याचा डिजिटल जमाना आहे. सोशल मीडियात अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली नवनवे ॲप्लिकेशन्स आले आहेत. हे ॲप्लिकेशन्स डाऊनलोड करण्याच्या मोहात फसवणूक होते.
अनोळखी ॲप डाऊनलोड केल्याने फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. यासाठी नागरिकांनी जागरुक राहण्याची गरज आहे. अनोळखी ॲप डाऊनलोड करणेच महागात पडू शकते.
सोशल मीडियातून फसगत होत असेल तर सावध झाले पाहिजे. तातडीने पोलिसांशी संपर्क साधून रितसर तक्रार दाखल करावी. दक्षता हाच उत्तम उपाय आहे.
दरवर्षी लाखो रुपयांना होतेय फसवणूक
लातूर जिल्ह्यात दरवर्षी जवळपास १५ ते २० लाख रुपयांना फसवणूक होत आहे.
यामध्ये बँक खात्यातील रक्कम परस्पर गायब करण्याचे प्रकार वाढले आहेत.
तक्रार दाखल झाल्यानंतर सायबरच्या तपासात लाखो रुपयांना गंडविल्याचे समोर आले आहे.
नागरिकांनी काळजी घ्यावी
सोशल मीडियातून फसवणूक होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. मोबाइलसह इतर तंत्रज्ञान वापरताना काळजी घेण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारी टाळायची असेल तर प्रत्येक नागरिकाने दक्ष राहिले पाहिजे. - निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक लातूर.