लातूर : उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने मोटरसायकली, मोबाईल, चेन चोर आणि शारीरिक हल्ले करणाऱ्या गुन्हेगारांवर पाळत ठेवून चार दुचाकींसह नऊ जणांना जेरबंद केले असून, या पथकाने त्यांच्याकडून चार दुचाकींसह मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त केली आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार दुचाकींची चोरी झाल्याचा गुन्हा नोंद झाला होता. त्यात हणमंत धोंडिराम मोरे (२३, रा. उटी बु., ता. औसा ह.मु. दौंड, जि. पुणे), धनंजय परमेश्वर धुमाळ (२०, रा. राजे शिवाजीनगर, लातूर) यांना पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या चार मोटरसायकली जप्त करण्यात आल्या. तर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सागर ऊर्फ टिल्लू भगवान सोनवणे (२३, पटेल नगर), किरण मारोती मळेकरी (१९, रा. माताजी नगर) यांनी ट्यूशन परिसरात मोबाईल हिसकावून पळून गेले होते. सदर गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली असून, ११ हजार किमतीचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण ३३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश ऊर्फ शक्ती अशोक गुरणे (२१), इस्माईल उर्फ बाबा जलिल शेख (२२), आकाश सुरेश सकट (१९), राहुल नागनाथ तांबरे (२२), सागर उद्धव कांबळे (२३, सर्व रा. माताजी नगर) हे गुन्हा घडल्यापासून बऱ्याच दिवसांपासून फरार होते. त्यांना शिताफीने पकडून विवेकानंद चौक पोलिसात हजर केले. विशेष पथकातील पोलीस कर्मचारी वहिद शेख, आर.बी. ढगे, माधव बिलापट्टे, अभिमन्यू सोनटक्के, सोमनाथ खडके यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वी केली.