लातूर : महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून अमन मित्तल यांनी बुधवारी पदभार स्वीकारला. मावळते आयुक्त देविदास टेकाळे यांच्याकडून पदभार घेतल्यानंतर लागलीच नूतन आयुक्तांनी विभाग प्रमुखांची बैठक घेतली. एकही प्रलंबित काम राहणार नाही, याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी या बैठकीत दिले.
दरम्यान, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, नगरसेविका सपना किसवे, पूजा पंचाक्षरी, फरजाना बागवान, गीता गौड, आदींनी नूतन आयुक्तांचे स्वागत केले. पदभार घेतल्यानंतर आयुक्त अमन मित्तल यांनी सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेतली. ओळखीनंतर प्रत्येकाशी संवाद साधला. एकही फाईल प्रलंबित राहणार नाही, याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. फाईल पूर्ण करण्यास काही अडचण असेल, समस्या उद्भवत असेल, तर तत्काळ माझ्याशी संपर्क साधावा. परंतु, फाईल प्रलंबित ठेवू नये, अशी सूचना त्यांनी पहिल्याच बैठकीत केली.
पाणीप्रश्न, ऑनलाईन बांधकाम परवाने, टॅक्स वसुली, आदींबाबत सकारात्मक काही निर्णय घेतले जातील. जेणेकरून मनपाचे उत्पन्नही वाढेल. त्यासाठी सर्वांनी कामावर लक्ष केंद्रित करावे. त्यासाठी आपण उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.