उजनी : उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने येथे नवीन इमारत उभारण्यात आली आहे. मात्र, तिचे अद्यापही हस्तांतरण झाले नसल्याने ती वर्षापासून धूळ खात पडून आहे. परिणामी, आरोग्याधिकारी व कर्मचाऱ्यांना जुन्याच इमारतीतून आरोग्यसेवा द्यावी लागत आहे. सध्या कोविड लसीकरणासाठी आलेल्यांना थांबण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे.
औसा तालुक्यातील उजनी हे मोठ्या बाजारपेठेचे गाव आहे. लातूर व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर आणि औसा-तुळजापूर महामार्गावर हे गाव आहे. उजनी व परिसरातील रुग्णांना वेळेवर प्रथमोपचार मिळावेत तसेच आरोग्यसेवा मिळावी म्हणून येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या केंद्राअंतर्गत पाच उपकेंद्रे असून आशिव, वांगजी, आशिव तांडा, चिंचोली, मासुर्डी, बिरवली, टाका, गूळखेड, रिंगणीवाडी, एकंबी तांडा, कमालपूर, काकसपूर, धुत्ता, भंडारी येथील रुग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागात दररोज १०० पेक्षा अधिक रुग्णांची नोंदणी असते.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत तीन खोल्या आहेत. त्यातील दोन खाेल्यांची पझझड झाली आहे. एक खोली वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्णतपासणीसाठी आहे. परिणामी, उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी खोलीही नाही. विशेष म्हणजे, बाळंतपणासाठी एखादी गरोदर माता आल्यानंतर मोठी अडचण निर्माण होत आहे. या परिसरात नेहमी अपघात घडतात. तेव्हा अपघातग्रस्तास प्रथमोपचारासाठी आणले असता पत्र्याच्या खोलीत उपचार केले जातात.
दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीची ही स्थिती पाहून चार कोटी रुपये खर्चून नवीन इमारत बांधण्यात आली. ती निर्माण होऊन वर्षभराचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही नवीन इमारतीचे हस्तांतरण झाले नाही. परिणामी, जुन्याच केंद्रावरून सेवा दिली जात आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचीही अडचण
जुनी इमारत जीर्ण झाल्याने आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. सध्या कोविड लसीकरणावर भर देण्यात येत आहे. मात्र, जागा नसल्याने लस घेण्यासाठी आलेल्यांना बसण्यासाठी मंडप टाकण्यात आला आहे. तिथेच लस दिली जात आहे. नवीन इमारतीचे लवकरात लवकर हस्तांतरण करण्यात येऊन प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आदेशाची प्रतीक्षा
नवीन इमारत पूर्ण झाली आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडून आरोग्यकेंद्र स्थलांतरित करण्याचे आदेश आले नाहीत. त्यांच्या आदेशाशिवाय नवीन इमारतीचा वापर करता येत नाही.
- डॉ. आर. एस. देवणीकर, वैद्यकीय अधिकारी
लवकरच स्थलांतर
येत्या काही दिवसांत नवीन इमारतीत आरोग्य केंद्राचे स्थलांतर होईल. त्या संदर्भात आदेश निघतील, असे जिल्हा परिषदेचे सदस्य नारायण लोखंडे यांनी सांगितले.