तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दरम्यान, त्याची कडक अंमलबजावणी केली जात आहे. तालुक्यातील नागराळ येथे ५०, बोरोळमध्ये २२ तर अचवलामध्ये ६४ कोरोनाबाधित असल्याने ही तीन गावे हाॅटस्पाॅट ठरली आहे. त्यामुळे या गावात आरोग्य विभागासह प्रशासन प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहे.
गावातील ज्येष्ठ नागरिकांनी कोविड लस घ्यावी म्हणून माजी जि.प. सदस्य दिलीप पाटील नागराळकर यांनी गावातील ज्येष्ठांना प्रवृत्त केले होते. स्वतः वाहनाची सोय करून सर्वात जास्त लसीकरण करून घेतले. सध्या नागराळ हे तालुक्यातील हॉटस्पॉट गाव म्हणून प्रशासनाने जाहीर केले आहे. नागराळ गावची लोकसंख्या जवळपास १ हजार असून बहुतांश नागरिक बाहेरगावी असतात. गावात असलेल्यांपैकी कोरोनाबाधितांची संख्या ५० च्या वर पोहोचल्याने प्रशासनापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी नागराळ गावाला भेट देऊन प्रशासनाला प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. गावातील कोणतीही व्यक्ती गावाबाहेर पडू नये. तसेच बाहेरगावच्या व्यक्तीने गावात येऊ नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोरोनाबाधितांना नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रात क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.
तहसीलदार सुरेश घोळवे यांनी तालुक्यात ॲन्टी कोरोना फोर्स पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी ग्रामसेवक, तलाठी, आशा कार्यकर्ती पुढाकार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावचे भूमिपुत्र बसवराज पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप गुरमे, वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग कलंबरकर, माजी जि.प. सदस्य दिलीप पाटील नागराळकर, ग्रामसेवक ईश्वर मुर्के, तलाठी सुनीता निनगुले, सरपंच विष्णू ऐनिले, उपसरपंच रतन पाटील आदी उपस्थित होते.
२३३ ॲक्टिव्ह रुग्ण...
तालुक्यातील ६००० जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यात ३२१ जण कोरोनाबाधित आढळले होते. त्यापैकी ८२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. सध्या २३३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राष्ट्रीयीकृत बँकेचे दोन व वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे सात असे एकूण ९ कर्मचारी बाधित आहे. तालुक्यातील ३४ गावांपर्यंत कोरोनाचा संसर्ग पोहोचल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.