लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नियम अधिक कडक केले आहेत. दरम्यान, शहर महानगरपालिकेनेही विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक मोहीम सुरूच ठेवली आहे. शनिवारी दिवसभरात ५९ जणांकडून ५ हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच महापालिकेच्या पथकाने दुकानदारांना गर्दी टाळण्यासाठी सूचना केल्या.
महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून काही निर्बंध लागू केले आहेत. त्याअंतर्गत रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली. या संचारबंदीच्या कालावधीत रस्त्यावर आढळून आलेल्यांवर पोलिसांकडून कारवाईही करण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभ कार्यक्रमांवर काही निर्बंध लागू केले आहेत. अनावश्यक होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरासह जिल्ह्यात प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गतच पालिका, नगरपंचायतींनी व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे.
दरम्यान, शहर महानगरपालिकेच्या वतीने महिनाभरापासून विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत विनामास्क आढळून येणाऱ्यांवर दंड आकारण्यात येत आहे.
शनिवारपासून महापालिकेच्या पथकाने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महात्मा गांधी चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील दुकानदारांना गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच दुकानासमोर नो मास्क-नो एन्ट्री असा फलक लावावा, अन्यथा दंड आकारण्यात येईल, असेही पथकाने व्यापाऱ्यांना सांगितले.