लोकमत न्यूज नेटवर्क
जळकोट : जळकोट तालुक्याची निर्मिती झाल्यापासून येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी होत आहे. परंतु, महावितरण व लोकप्रतिनिधींच्या उदासीन भूमिकेमुळे कार्यालयाच्या निर्मितीचा प्रस्ताव २२ वर्षांपासून धूळखात पडून आहे. त्यामुळे तालुक्यातील विद्युत ग्राहकांना आपल्या कामासाठी बाहेरील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
जळकोट तालुका हा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आहे. डोंगरी असलेल्या तालुक्यात सुविधा कमी आहेत. त्यातच शासन आणि प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. वारंवार प्रस्ताव दाखल करुन पाठपुरावा केला तरी त्याची दखल घेतली जात नसल्याचे पाहायला मिळत आहे. तालुका निर्मितीनंतर सर्व विभागांची कार्यालये तालुका मुख्यालयी स्थापन करणे क्रमप्राप्त ठरते. पण, येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय नसल्याने तालुक्यातील वीज ग्राहकांना शिरुर ताजबंद व उदगीर येथे हेलपाटे मारावे लागत आहेत. जळकोट तालुका एक असला तरी कारभार तीन ठिकाणहून चालतो. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना विविध अडचणींना सतत सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील विद्युत ग्राहकांच्या सोयीसाठी येथे महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरु करावे, अशी २२ वर्षांपासून मागणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला. परंतु, संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.