वीज बिलाबाबत सरकारने काही महिन्यांसाठी सवलत दिली होती. एवढेच नाही, तर थकीत वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करू नये, अशा सूचनाही दिल्या आहेत. काही ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडल्याने वीज बिल भरले नाहीत. निलंगा तालुक्यात शेकडाे जणांचा वीजपुरवठा ताेडण्यात आला आहे. जोपर्यंत बिल भरणार नाही, तोपर्यंत जाेडणी मिळणार नाही, अशी भूमिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. यामुळे सरकारचे ऐकावे, की अधिकाऱ्यांचे, हाच मोठा पेच ग्राहकांसमोर उभा ठाकला आहे. सदर वीज बिल माफ करावे, यासाठी स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा महावितरण कंपनीशी चर्चा केली. अनेकांनी मोर्चे काढले आहेत. आता या आशेवर ग्राहकांनी वीज बिल माफ होईल, म्हणून वीज बिलाची रक्कम भरली नाही. लॉकडाऊननंतर अचानक आलेल्या मोठ्या रकमेच्या बिलांचे आकडे पाहून ग्राहकांनाच माेठा शॉक बसला आहे. एकंदरीत जिल्ह्यात काेराेना रुग्णांची वाढती संख्या पाहता, नागरिकांची विस्कटलेली आर्थिक घडी, बँक, वित्तीय संस्थांच्या कर्जाचे हप्ते, ऑनलाइन शिक्षण खर्च, मंदावलेला व्यापार, शेतकऱ्यांच्या धान्याला नसलेला हमीभाव, आता कौटुंबिक खर्च आणि वीज बिल भरण्यासाठीसाठी सुरू असलेला तगादा, या सर्वच संकटांसमाेर ग्राहक मात्र मेटाकुटीला आला आहे. अशा स्थितीत वीज ग्राहकांना थकीत बिलापाेटी वीजपुरवठा खंडित केला जात आहे.
कोरोना संकटाबरोबर महावितरणचा ग्राहकांना ‘शाॅक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:20 IST