औसा तालुक्यात सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. शेतीसह जनावराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा स्थितीत महावितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी वीज बिलाचा भरणा करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत. काही शेतकरी आपल्या कुवतीप्रमाणे वीज बिलाची काही रक्कम भरण्यासाठी पुढे येत आहेत. काही शेतकरी वीजबील भरण्यासाठी पुढे येत आहेत, मात्र महाविरण कर्मचारी, अधिकारी ते भरुन घेण्यास तयार नसल्याचा आराेप केला जात आहे. आम्ही सांगेत तेवढीच रक्कम भरा, असा तगादा लावत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. हा प्रकार तातडीने थांबवावा, ताेडण्यात आलेला वीजपुरवठा पुन्हा सुरु करावा, या मागणीसाठी औसा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरणचे उप-कार्यकारी अभियंता जाधव यांना घेराव घालत निवेदन देण्यात आला. यावेळी शिवकुमार नागराळे, मुकेश देशमाने, महेश बनसोडे, विकास लांडगे, गोविंद चव्हाण, प्रशांत जोगदंड, नवनाथ कुंभार यांची उपस्थिती होती.
औसा येथे महवितरण अभियंत्याला मनसेचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:13 IST