बैठकीस अधीक्षक अभियंता इलियास चिस्ती, माजी सरपंच तथा सेवानिवृत्त अभियंता साहेबराव जाधव, कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, उपअभियंता निशिकांत उंबरकर, सेवानिवृत्त उपअभियंता सतीश बोर्डे, अभियंता एस.डी. पवार, घोडके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
अहमदपूर तालुक्यात ८ तर चाकूर तालुक्यात २ कोल्हापुरी बंधारे आहेत. त्यातून पाणी गळती होत असल्याने शेतीसाठी त्यातील पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे या कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार असल्याने आ. बाबासाहेब पाटील यांनी लवकरात लवकर कोल्हापुरी बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना केल्या.
एका बॅरेजेसाठी अंदाजे २० कोटींचा खर्च लागणार आहे. त्यासंदर्भातील परिपूर्ण अहवाल सादर करावा. तसेच लिंबोटी प्रकल्पामुळे सध्या अहमदपूर तालुक्यातील ३ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. प्रकल्पाच्या कालव्याचे काम, पुलाचे काम लवकर करण्यात यावे. अहमदपूर- चाकूर तालुक्यातील पाटबंधारे विभागाची कामे लवकर करावीत. त्यासाठीच्या निधीसाठी पाठपुरावा करावा, अशा सूचना करण्यात आल्या. यावेळी वैरागड साठवण तलाव, उपसा सिंचन योजनेचा आढावा घेण्यात आला. वैरागड साठवण तलावाचे काम संथ गतीने सुरू असल्याने सूचनाही केल्या.
सिंचन वाढविणे गरजेचे...
अहमदपूर व चाकूर तालुके हे दुष्काळी असून अनेक वर्षांपासून सिंचन क्षमता वाढली नाही. त्यामुळे मन्याड नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याऐवजी बॅरेजेस केल्यास सिंचन क्षमता वाढून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याने गोदावरी पाटबंधारे मंडळाची बैठक घेऊन सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या सूचना केल्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी सांगितले.
बॅरेजेससंबंधी प्रस्ताव पाठविणार...
अहमदपूर, चाकूर तालुक्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आ. बाबासाहेब पाटील यांनी अधीक्षक अभियंत्यांसोबत वैरागड, लिंबोटी कॅनॉल व बॅरेजेससंबंधी चर्चा झाली. त्यासाठीचा सकारात्मक प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविणार असल्याचे गोदावरी पाटबंधारे मंडळाच्या अहमदपूर विभागाचे उपअभियंता निशिकांत उंबरकर यांनी सांगितले.