मराठवाडा सर्व श्रमिक संघटना आणि नगर परिषद कर्मचारी संघटनांच्या वतीने हे आंदोलन पुकारण्यात आले होते. मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून कर्मचाऱ्यांनी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला होता. आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष रामदास शिंदे, रमाकांत पिडगे, सुनीता शिंदे,नागनाथ लोखंडे, बंडू किसवे, महादेव पिस्के, राजकुमार दुर्वे, सोनवणे, एस.बी.पाटील, पी.डी. सुरवसे आदी सहभागी झाले होते. ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंगळे यांच्यावर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला केला. त्या जखमी झाल्या. या दंडेलशाहीचा लातुरात निषेध करण्यात आला. हल्लेखोरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनादरम्यान करण्यात आली.
दरम्यान जिल्ह्यातील उदगीर, निलंगा, औसा,अहमदपूर या नगरपालिकांतील कर्मचाऱ्यांनीही काम बंद आंदोलन करून हल्ल्याचा निषेध नोंदविला. विविध कर्मचारी संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे हल्लेखोरांना अटक करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.