रहदारीस अडथळा; टेम्पोचालकावर गुन्हा
लातूर : शहरातील पाच नंबर चौकानजीकच्या पेट्रोल पंपाजवळील रहदारीच्या रस्त्यावर चालकाने टेम्पो (एमएच १३ आर २०३३) उभा करून स्वत:च्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस काॅन्स्टेबल मयूर मुगळे यांच्या फिर्यादीवरून शनिवारी टेम्पोचालकाविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बिराजदार हे करीत आहेत.
सुगंधित तंबाखू, गुटख्याची चोरून विक्री
लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी पानटपऱ्या बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हाभरातील पानटपऱ्या बंद असल्या तरी चोरून सुगंधित तंबाखू, गुटखा, पानमसाल्याची विक्री होत आहे. विशेष म्हणजे सदरील साहित्य विक्रीस राज्य शासनाने काही वर्षांपूर्वीच प्रतिबंध केला आहे. सध्या दुप्पट दराने या साहित्याची विक्री केली जात आहे. संबंधितांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक झाले हैराण
लातूर : उन्हाचा पारा वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक पंखा, कुलरचा वापर करू लागले आहेत. दरम्यान, महावितरणच्या दुर्लक्षाने सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने बेजार होत आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. महावितरणने सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी सातत्याने मागणी होत आहे.
हडको काॅलनीतील पथदिवे सुरू करावेत
लातूर : शहरातील एमआयडीसीतील हडको काॅलनी भागातील बहुतांश ठिकाणचे पथदिवे बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये-जा करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.