लातूर : शहरासह जिल्ह्यात घरफाेड्या, माेटारसायकल चाेरी, वाटमारीच्या घटना अलीकडे वाढल्या असून, यातील ‘माेस्ट वाँटेड’ असलेले तब्बल १ हजार ११५ गुन्हेगार पाेलीस पथकांच्या रडारवर आहेत. जानेवारी ते डिसेंबरअखेर यातील २३ जणांना अटक करण्यात आली आहे.
अद्यापही गंभीर गुन्ह्यांतील १०५ गुन्हेगार पाेलिसांना चकवा देत फरार आहेत.
लातूर शहरासह जिल्ह्यातील एकूण २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत वर्षभरात घरफाेडीसह वाटमाऱ्यांच्या घटनात वाढ झाली आहे. खून, दराेडा, घरफाेड्यांतील गुन्हेगार पाेलिसांच्या हाती लागत नाहीत. परिणामी, चाेरट्यांच्या टाेळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबरअखेर १ हजार ११५ अट्टल गुन्हेगार फरार आहेत. त्यांच्यावर पाेलिसांची करडी नजर असून, त्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहे. मात्र, यातील केवळ २३ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत, तर १०५ अट्टल गुन्हेगारांना पाेलिसांनी फरार घाेषित केले आहे. त्यांचा शाेध पाेलीस रात्रंदिन घेत आहेत.
माेस्ट वाँटेड गुन्हेगारांचे सर्च ऑपरेशन सुरूच...
जिल्ह्यातील प्रत्येक पाेलीस ठाण्यांकडून गंभीर गुन्ह्यांची माहिती संकलित केली जात आहे. अट्टल असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतील आराेपींना अटक करण्यासाठी सध्या ‘सर्च ऑपरेशन’ सुरू करण्यात आले आहे.
- निखिल पिंगळे, जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर
लातूर शहर आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, दराेडा आणि वाटमारी प्रकरणातील अट्टल १०५ गुन्हेगारांचा पाेलिसांना अद्यापही शाेध लागेना. त्यांच्या अटकेसाठी पाेलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तर प्रवासादरम्यान, वाहनांच्या कॅरियरवर असलेल्या बॅगा पळविण्याच्या घटनांची नवी क्राईम स्टाईल सध्याला जिल्ह्यात पाहावायस मिळत आहे. लातूर ते अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर एकाच महिन्यात दाेन प्रवासी वाहनांना लुटल्याची नाेंद पाेलीस दप्तरी आहे.