औसा तालुक्यातील भंगेवाडी येथील नीळकंठ पाटील यांच्या मुलाचा विवाह कबनसांगवी येथील मुलीशी भंगेवाडी येथे सोमवारी आयोजित करण्यात आला होता. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने नियम लागू केले आहेत. २५ पेक्षा अधिक नातेवाईक असल्यास ५० हजाराचा दंड आकारण्याचे आदेश आहेत. या लग्नासाठी २५ पेक्षा अधिक नातेवाईक जमा होऊन गर्दी झाल्याचे समजताच किनीथोटे येथील बीट अंमलदार राजेश लामतुरे, ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.
भंगेवाडीतील लग्नात गर्दी केल्याची तक्रार अनेकांनी वरिष्ठाकडे केल्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन नवरदेवाच्या वडिलांना ५० हजाराचा दंड आकारण्यात आला. दंडाच्या रकमेची पावती ग्रामसेवक अर्चना उटगे यांनी नीळकंठ पाटील यांना दिली. विवाह सोहळ्यात नियमापेक्षा अधिक लोकांना सहभागी केल्याने आर्थिक दंड आकारण्याची औसा तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.