माजी आ. भालेराव म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात उदगीर येथील शासकीय औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव शासन दरबारी होता. तसेच उदगीर येथील नवीन बसस्थानक, तहसील कार्यालयाच्या कामाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले होते. दरम्यान, निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे त्या कामाची सुरुवात होऊ शकली नाही. आता विद्यमान राज्यमंत्री संजय बनसोडे हे उदगीरची शासकीय औद्योगिक वसाहत मी मंजूर करून आणली. तहसील कार्यालयाची प्रशासकीय इमारत माझ्यामुळेच मंजूर झाली, अशा प्रकारच्या घोषणा करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. तसेच उदगीरच्या बसस्थानकाचे काम चालू होते. मात्र, ते बंद करून सदरील काम बीओटी तत्त्वावर सुरू केले. त्या मार्गाने तयार होणारे व्यावसायिक गाळे आपल्या मर्जीतील व्यक्तींना देण्यासाठी हे बांधकाम बंद केले होते, असा आरोपही केला. एक वर्षाच्या कार्यकाळात एकही नवीन काम उदगीर-जळकोट मतदारसंघासाठी आणलेले नाही. केवळ माझ्या कार्यकाळात प्रस्तावित असलेल्या कामांच्या मंजुरीचे श्रेय ते घेत आहेत, असा आरोपही भालेराव यांनी केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे, वसंत शिरसे, धर्मपाल नादरगे, शिवाजी भोळे, आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
माझ्या कार्यकाळातील कामाचे श्रेय मंत्र्यांनी घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:35 IST