वाढवणा परिसरात रस्त्यांची दुरवस्था
वाढवणा बु. : उदगीर तालुक्यातील वाढवणा बु. परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी माेठमाेठे खड्डे पडले आहेत. वाढवणा ते डांगेवाडी हा रस्ताही पूर्णत: उखडला आहे. तर वाढवणा ते वाढवणा पाटी या मार्गाचीही माेठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्याशिवाय, वाढवणा पाटी ते किनी यल्लादेवी हा रस्ताही उखडला आहे. परिणामी, वाहनधारकांसह स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. रस्त्यांची दुरस्ती करावी, अशी मागणी हाेत आहे. मात्र, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे. रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली केवळ डागडुजी आणि थातूरमातूर काम केले जात असल्याचा आराेपही नागरिकांतून हाेत आहे.
उदगीर बसस्थानकात प्रवाशांची हेळसांड
उदगीर : येथील बसस्थानकाची माेठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या बसस्थानकाचे पाडकाम करुन नव्या बसस्थानकाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी गेल्या तीन वर्षांपासून हाेत आहे. नव्या बसस्थानकाच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, तेही काम सध्याला रखडले आहे. बसस्थानकात सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांची माेठ्या प्रमाणात हेळसांड हाेत आहे. बसस्थानकात घाणीचे साम्राज्य पसरले असून, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष हाेत आहे. उदगीर शहर हे प्रमुख बाजारपेठेचे केंद्र आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा राज्यातील नागरिक येथे व्यापारानिमित्त माेठ्या प्रमाणावर ये-जा करतात. आंतरराज्य बससेवाही येथून माेठ्या प्रमाणावर सुरु आहे. प्रवाशांची कायम वर्दळ असल्याने मंजूर असलेल्या नव्या बसस्थानकाची उभारणी करावी, अशी मागणी हाेत आहे.