कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजीमंत्री तथा महेश अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब जाधव होते. यावेळी राज्याच्या पणन महासंघाचे चेअरमन आ. बाबासाहेब पाटील, उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, संचालक शिवानंद हेंगणे, संचालक आशिष गुणाले, संचालक दिलीप जाधव, संचालक ॲड. विनायकराव भोसले, संचालक सतीश कल्याणे, संचालक अशोक गादेवार, संचालिका सत्यवती कलमे, संचालिका संगीता खंडागळे, संचालक ॲड. भारतभूषण क्षीरसागर, बी. के. क्षीरसागर, सिद्राम रंदाळे, एस.पी.गडे, एस. आर. महाजन यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
आमदार पाटील म्हणाले, कोरोना महामारीच्या कठीण काळातही बँकेची स्थिती पाहून बँकेला ऑडिट ‘वर्ग -अ’ मिळाला आहे. आरबीआयच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करीत बँकेची वाटचाल सुरू असून, आर्थिक वर्ष २०१९-२० यामध्ये बँकेचा एकूण व्यवसाय ४५४ कोटी ८३ लाख झाला आहे. व्यवसायात ११.०९ टक्के वाढ झाली आहे. बँकेचा आयकर पूर्व नफा १ कोटी ७४ लाख झाला आहे तर निव्वळ नफा १ कोटी ६ लाख झालेला आहे. बँकेच्या एकूण ठेवी ३०२ कोटी ३६ लाख आहेत. कर्ज १५२ कोटी ४६ लाख आहे. सीआरएआरचे प्रमाण १५.५६ टक्के आहे. तसेच कोरोना महामारीमुळे अडचणी आल्या असल्या तरीही भविष्यकाळात बॅक चांगली चालवून महाराष्ट्रात बँकेचा नावलौकिक करणार असल्याचेही ते म्हणाले. आजच्या बँकेच्या प्रगतीत बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व संचालक मंडळ, कर्मचारी, ग्राहक यांना श्रेय जाते. असे त्यांनी सांगितले. आ. बाबासाहेब पाटील यांची पणन महासंघाच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल महेश अर्बन बँकेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कोरोनाबद्दलच्या सर्व सूचनांचे पालन करण्यात आले.
बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे यांनी अध्यक्षाच्या वतीने बँकेच्या सर्वसाधारण सभेच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. प्रास्ताविक बँकेचे सहायक व्यवस्थापक सिद्राम रंदाळे यांनी केले. तर बँकेचे संचालक शिवानंद हेंगणे यांनी आभार मानले.