उदगीर : येथील तालुका विधी सेवा समिती व विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
या लोकन्यायालयात दिवाणी स्वरुपाची, फौजदारी, धनादेशविषयक, मोटार अपघात नुकसानभरपाई, वीजबिल, बँक, टेलिफोन दावे, वादपूर्व प्रकरणे, विद्युत कायद्यासंबंधीची प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोकन्यायालयाचे आयोजन झाले नव्हते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून शासनाने लागू केलेल्या नियमांचे पालन करुन या लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकार, विधीज्ञ यांना शारीरिक अंतर राखून तसेच मास्क, सॅनिटायझरचा वापर करुन यात सहभागी होता येणार आहे.
पक्षकार व विधिज्ञ मंडळींनी आपले दावे लोकन्यायालयात तडजोडीसाठी ठेवून लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश नाजिम मणेर, उदगीर वकील संघाचे अध्यक्ष ॲड. बालाजी पाटील टाकळीकर यांनी केले आहे.