लातूर : स्वत:च्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार तसेच मटका खेळविण्यात येत असलेल्या दोन ठिकाणांवर पोलिसांनी धाडी टाकून जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम, मोबाईल, तीन दुचाकी असे एकूण ९२ हजार ४४५ रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत शनिवारी (दि. ३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी करण्यास मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत तसेच चेहऱ्याला मास्क न लावता विनापरवाना स्वत:च्या फायद्यासाठी तिर्रट नावाचा जुगार शहरातील भांबरी चौक येथे सुरू होता. तेव्हा पोलिसांनी छापा टाकून जुगाराच्या साहित्यासह रोख ३ हजार ५ रुपये, तीन मोबाईल आणि तीन दुचाकी असा एकूण ९२ हजार पाच रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल सोन्याबापू देशमुख यांच्या फिर्यादीवरून नऊजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच रेणापूर तालुक्यातील डिगोळ देशमुख येथेही धाड टाकून रेणापूर पोलिसांनी जुगाराच्या साहित्यासह रोख ४४० रुपये जप्त केले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद आहे.